मुंबई : महापालिका निवडणुकीत प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु असे सांगणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील सर्व जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावरच लढणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवरुन लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. महापालिका निवडणूक, भाजप, शिवसेना, नोटाबंदी ते राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या वादावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेना-भजपची युती होण्याची शक्यता धुसर असताना ‘प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू’ असे राज ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले होते. मात्र बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज ठाकरेंनी स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. भाजप आणि शिवसेनेकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही. आता त्यांच्याकडे फक्त पैसा असून पैशाच्या आधारे ते अन्य पक्षातील लोकांना फोडत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली.
मुंबई महापालिकेलीत भ्रष्टाचारावरुनही राज ठाकरेंनी मत मांडले. ठाकरे म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचारासाठी शिवसेनेसोबत भाजपही तितकीच जबाबदार आहे. ऐवढ्या वर्षात भाजपला भ्रष्टाचार दिसला नाही. पण तुम्ही दोघांनी मिळूनच फावडा मारला ना असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चांगले संबंध असल्याचे दिसून आले होते. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या वेळी फडणवीस यांनी राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मध्यस्थी केल्याची चर्चा होती. यावर राज ठाकरे म्हणाले, चांगले संबंध म्हणजे काय?, ज्या गोष्टी मला पटणार नाही त्याविरोधात मी बोलणारच असे त्यांनी सांगितले. जीवंत माणसाला वार्यावर सोडून पुतळे कसले बांधता असा प्रश्नही त्यांनी शिवस्मारकावरुन उपस्थित केला. प्रसारमाध्यमांची भूमिका बदलत आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये मोदी सरकारविरोधात एकही शब्द बोलला किंवा छापून येत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महापालिका निवडणुकीत प्रचाराची रणनिती काय असणार असा प्रश्न विचारला असता मी ट्रेलर दाखवत नाही, थेट पिक्चरच दाखवतो असे त्यांनी सांगितले.