संजय बोरकर / नवी मुंबई
नेरूळ येथील श्रीगणेश रामलीला मैदानावर सुरु असलेल्या आगरी-कोळी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 4 जानेवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव 15 जानेवारीपर्यत चालणार आहे. या महोत्सवात यंदा पाच लाखाहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्क, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील नगरसेवक नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे हा महोत्सव राबविला जात आहे. नवी मुंबई शहर विकसित झाले असुन बाहेरून आलेल्या समाजाला येथील स्थानिक आगरी-कोळी संस्कृतीचा परिचय व्हावा यासाठी नामदेव भगत यांनी दशकभरापूर्वी हा महोत्सव सुरू केला. दरवर्षी या महोत्सवामध्ये सहभागी होणार्या नागरिकांची गर्दी वाढत असून अजून महोत्सव चार दिवस सुरू राहणार आहे. यंदा या महोत्सवाला पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी होत असल्याने यंदाचा महोत्सव पाच लाखापेक्षा अधिक गर्दी करणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक नामदेव भगत यांनी सांगितलेे.
या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईतील स्थानिक कलावंतांना व्यासपिठ मिळाले असुन दररोज नवनवीन कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करत असतात. या महोत्सवामध्ये शाकाहारी आणि मासांहारी दोन्ही प्रकारच्या घटकांसाठी स्टॉल उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या स्टॉलवर खवय्यांची वाढती गर्दी पहावयास मिळत आहे. विविध प्रकारचे मासे, मटन व त्याला आगरी-कोळी झणका यामुळे स्वादिष्ट,रूचकर जेवणाची मेजवानी या महोत्सवामुळे खवय्यांना उपलब्ध झाली आहे. शाकाहारी लोकांसाठीदेखील विविध प्रकारच्या स्टॉलमधून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पोटपूजा करण्यासाठी उपलब्ध आहेत. दररोज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच क्रिडा क्षेत्रातील मान्यवर महोत्सवाला भेट देत आहेत.
दुसर्या बाजूला बच्चे कंपनीसाठी मिनी फन-फेअरच्या धर्तीवर विविध खेळ, पाळणे व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे नेरूळ व सभोवतालच्या परिसरातील नागरिक सहपरिवार महोत्सवात सहभागी होवून महोत्सवाचा आनंद लुटत आहेत. विविध स्टॉलमधून लोणची, मसाल्याचे पदार्थ, स्टीलची भांडी, खेळणी, शोभिवंत वस्तू आदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मनोरंजन, पोटपूजा, शॉपिंग, मुलांचे खेळ आदी सर्व एकाच ठिकाणी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने आगरी-कोळी महोत्सव गेल्या काही वर्षात नेरूळ पट्टीतील एक अविभाज्य भाग बनू लागला असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजन नामदेव भगत यांनी दिली.