नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने ठोक मानधनावर १६१ शिक्षक भरतीची प्रक्रियासुरू केली होती. या शिक्षक भरतीला महापालिका शाळांमध्ये विनावेतन शिकविण्याची तयारी दर्शविणार्या १२२ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने महापालिकेच्या शिक्षक भरतीला स्थगिती दिली आहे.
महापालिका शिक्षण मंडळाने तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर २०११ साली १२२ शिक्षकांची भरती केली होती. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यावर ठोक मानधनावरकाम करणार्या १२२ शिक्षकांची मुदत गेल्या नोव्हेंबर महिन्यात संपल्यावर त्यांची सेवा खंडित केली होती. महापालिका आयु्क्त तुकाराम मुंढे यांनी ठोक मानधनावरकाम करणार्या १२२ शिक्षकांना कामावरून कमी केल्यानंतर या शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विनावेतन काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार सदर १२२ शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून फुकटात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. मात्र, मागील महिन्यात महापालिका शिक्षण विभागाने अचानक ठोक मानधनावर १६१ शिक्षक भरतीची जाहिरात काढल्याने १२२ शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले होते.
शासनाकडे शिक्षक अतिरिक्त असल्याने आपण शासनाकडे शिक्षक समायोजनाची मागणी केल्याने या ठोक मानधनावरील शिक्षकांना त्यांची मुदत संपल्यानंतर नवीन नियुक्तीपत्र दिले नसल्याचे महापालिका शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. दरम्यान, १२२ पैकी काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपणास महापालिका सेवेत कायम सेवेत सामावून घ्यावे आणि सीईटी होईपर्यंत नोकरीस ठेवावे अशी मागणी केली होती. तसेच जोपर्यंत समायोजनाचे शिक्षक महापालिकेला मिळत नाहीत तोपर्यंत विनावेतन काम करण्याची तयारी १२२ शिक्षकांनी दाखविल्यावर तसे आदेश न्यायालयाने महापालिका शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार १५ नोव्हेंबर २०१६ पासून सुमारे १२२ शिक्षक विनावेतन महापालिका शाळेत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. १२२ शिक्षक विनावेतन महापालिका शाळेत शिकवित असतानाही महापालिका शिक्षण मंडळाने गेल्या डिसेंबर महिन्यात १६१ शिक्षकांची १२ हजार रुपये ठोक मानधनावर भरतीची जाहिरात काढून भरती प्रक्रिया सुरू केली होती. या भरतीला शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. २७ जानेवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका शिक्षण विभागाने सुरु केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती महापालिका शाळेत विनावेतन शिकविणार्या शिक्षकांनी दिली.