नवी मुंबई : शहर विकासात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून सर्वांच्या एकत्रित सहभागाशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही असे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिका पार पाडत असताना नागरिकांनीही त्याचा योग्य रितीने वापर करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी व शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. से.19,नेरूळ येथील गुरू नानकसाहीब उद्यानात नागरिकांच्या उत्साही उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी थेट सुसंवाद साधला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील 500 शहरांचे सर्व्हेक्षण सुरू असून नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर आपले स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदवून त्यात सहभागी व्हावे असे आवाहन करतानाच स्वच्छता हा अभियानापुरता मर्यादीत विषय नाही तर ती आपली कायमस्वरूपी सवय व्हायला हवी असे सांगितले. महानगरपालिका दैनंदिन स्वच्छतेचे काम करीत आहेच मात्र नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचराच करणार नाही याची काळजी घेतली तर आपोआप शहर स्वच्छ राहील असे ते म्हणाले. घरातला कचरा बाहेर टाकून आपण आपले घर साफ झाले असे म्हणतो, मात्र आपला परिसर, आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी का पार पाडत नाही असा प्रश्न करीत आयुक्तांनी ओला व सुका कचरा निर्माण होतो त्या ठिकाणापासून म्हणजे घरापासूनच वेगवेगळा केला जावा ही भूमिका पुन्हा स्पष्ट केली. आता रस्त्यांवर ठिकठिकाणी लिटर बिन्स बसविण्याचे काम सुरू असून नागरिकांनी त्याचा वापर करून शहर घाण होणार नाही याची काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.
शहरात पार्कींगची मोठी समस्या जाणवते इकडे लक्ष वेधत आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आपली वाहने नागरिकांनी सोसायटीमध्येच पार्क करावीत असे स्पष्ट केले. पार्कींगसाठी जागा उपलब्ध असतील एवढीच वाहने नागरिकांनी वापरावीत व जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुक साधनांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. यादृष्टीने महापालिकेची परिवहन सेवा नागरिकांसाठी अधिक सुविधाजनक करण्यावर भर दिला जात असून मोबाईल ॲपव्दारे बसच्या वेळा, कोणती बस कोणत्या बसथांब्यावर किती वाजता येईल अशी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल व त्याप्रमाणे प्रवाशांना वेळेचे नियोजन करता येईल अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील पदपथ अडथळाविरहीत व चालण्यायोग्य करून शहरातील वॉकेबिलिटी वाढविण्यावर भर दिला जात असून जूनपर्यंत हा सकारात्मक बदल आपणास दिसेल असे ते म्हणाले.
मालमत्ताकराची थकबाकी मोठ्या प्रमाणावर बाकी असून त्याची देयके अदा करण्यात आली आहेत, नागरिकांनी ती भरावीत असे आवाहन करतानाच आयुक्तांनी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असे स्पष्ट केले. या आठवड्यात 23 मालमत्तांची अटकावणी केली असून टप्प्याटप्प्याने सर्वच थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना आपला मालमत्ताकर, पाणीपट्टी महापालिका कार्यालयात न जाता अगदी असतील तेथून सहज भरता यावी तसेच नागरी सुविधांविषयीच्या आपल्या तक्रारी, सूचना करण्यात याव्यात याकरीता अत्याधुनिक तक्रार निवारण प्रणालीसह NNMC e-connect हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून यावर महानगरपालिकेकडून आवश्यक असणारे जन्मदाखला, मृत्यूदाखला, विवाह नोंदणी तसेच विविध परवाने, प्रमाणपत्रे यांचीही नोंदणी करता येईल अशी माहिती देत आयुक्तांनी हे ॲप प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून त्याचा सुयोग्य वापर करावा असे आवाहन केले.
वॉक विथ कमिशनर उपक्रमाच्या माध्यमातून विभागाविभागात गेल्यानंतर तेथील नागरिकांना भेटून, त्यांच्याशी बोलून, त्यांच्या अपेक्षा कळतात, अडचणी लक्षात येतात, शहराविषयीच्या संकल्पना जाणून घेता येतात त्यामुळे हा उपक्रम शहर विकासात अत्यंत महत्वाचा आहे असे सांगत यावेळी विशेषत्वाने पार्कींग, स्वच्छता, पाळीव कुत्र्यांचा त्रास, रस्ते-पदपथ-दिवाबत्ती, उद्यानातील सुविधा अशा विविध बाबींवर आयुक्तांनी नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले व लगेचच करावयाच्या बाबींवर 7 ते 15 दिवसात कार्यवाही होईल तसेच धोरणात्मक बाबींवर सुयोग्य कार्यवाही सुरू करण्यात येईल असे सांगितले.
सार्वजनिक सुविधांच्या पुर्ततेसाठी महापालिका कटिबध्द असून नागरिकांनी त्या सुविधा चांगल्या रितीने वापरल्या तर नक्कीच आपले नवी मुंबई शहर नेहमीच अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त करणा-या महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयक्षम कार्यप्रणालीचे व प्रत्यक्ष नागरिक भेटीच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाचे यावेळी नागरिकांनी मुक्तकंठाने कौतुक केले.