बाळाराम पाटील तिसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात, दोनदा पराभव
पनवेल : सध्या पनवेल व आजूबाजूच्या परिसरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणूकीला उशीर असला तरी देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे पनवेल परिसरातील वातावरण तापू लागलेले आहे. त्यातच येत्या ३ फेब्रुवारीला कोकण शिक्षक मतदार संघासाठी मतदान होत असून पुरोगामी शिक्षक आघाडीचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजपतर्फे शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बाळाराम पाटील व वेणूनाथ कडू यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. बाळाराम पाटील हे तिसऱ्यांदा आमदारकीच्या निवडणूकीला सामोरे जात आहेत. दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या वेळी ते शिक्षक मतदार संघातून आमदारकीला उभे आहेत. बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्ते गेल्या चार पाच महिन्यापासून मेहनत घेत आहेत.
कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणुकीसाठी मतदान येत्या शुक्रवारी ३ फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील १० हजार ९ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर पनवेल तालुक्यातून ३८१६ शिक्षक मतदान करणार आहेत. एकूण मतदारांपैकी १३९४ पुरुष तर २४२२ महिला आहेत. त्यामुळे पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील यांना पनवेलमधून आघाडी देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. तर वेणूनाथ कडू यांना विजयी करण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर मेहनत घेत आहेत. या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. शिवसेनेने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तर राष्ट्रवादी शेकाप आघाडीने बाळाराम पाटील व लोकभारतीकडून अशोक बेलसरे निवडणूक लढवत आहेत. भाजपप्रणीत शिक्षक परिषदेने वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिल्याने रामनाथ मोते नाराज झाले व त्यांनी बंडखोरी केली. याचा फायदा बाळाराम पाटील यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, शिक्षक भारती यासह तब्बल १० उमेदवार कोकण शिक्षक मतदार संघाच्या रिंगणात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. तर मतमोजणी सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कोकण शिक्षक मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश असून ३७ हजार ६४६ मतदार आपला प्रतिनिधी निवडून देणार आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १५७३६ मतदार आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या विजयामध्ये ठाणे जिल्हा सर्वाधिक महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. तर सर्वाधिक कमी २ हजार ४५६ मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. त्यामुळे कोकण शिक्षक मतदार संघातून कोणता उमेदवार विजयी होतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २००९ च्या आमदारकीच्या निवडणूकीत पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर व बाळाराम पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शेकापची ५२ वर्षांची विजयी परंपरा मोडीत काढीत काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या प्रशांत ठाकूर यांनी इतिहास घडविला होता. प्रशांत ठाकूर यांना ८० हजार ६७१ मते मिळाली होती. तर बाळाराम पाटील यांना ६७ हजार ७१० यांना मते मिळाली होती. शेकापचे बाळाराम पाटील यांचा प्रशांत ठाकूर यांनी १२ हजार ९६१ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ मध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलवून ठाकूर यांनी नवा इतिहास घडविला. २०१४ झालेल्या मतमोजणीत प्रशांत ठाकूर यांना १२५१४२ तर बाळाराम पाटील यांना १११९२७ मते मिळाली. २०१४ मध्ये प्रशांत ठाकूर यांनी १३२१५ मतांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. त्यामुळे बाळाराम पाटील यांना आमदारकीने दोनदा हुलकावणी दिली आहे. मात्र दोनदा पराभूत होऊन देखील शेकापचे बाळाराम पाटील हे तिसऱ्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत उतरले आहेत. मात्र विधानसभेच्या नव्हे तर कोकण शिक्षक मतदारसंघातून. गुजरात राज्याच्या सिमेवरील तलासरीपासून ते गोवा राज्याच्या बांद्यापर्यंत पाच जिल्ह्यात हा मतदार संघ पसरला आहे. ७ खासदार, ४० आमदार, ७ महानगरपालिका, यांचे कार्यक्षेत्र या मतदारसंघात समाविष्ट आहे. २००० च्या पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था या मतदार संघात आहेत. बाळाराम पाटील यांचे वडील दत्तात्रेय पाटील हे तीन वेळा पनवेलचे आमदार झाले होते मात्र त्यांचे पुत्र बाळाराम पाटील यांना दोनदा आमदारकीने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची बाळाराम पाटील यांना आमदार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व समविचारी पक्षांना एकत्र घेत बाळाराम पाटील निवडणूक लढवत आहेत. मात्र समोर वेणूनाथ कडू, अशोक बेलसरे, रामनाथ मोते यांच्याशी सामना असल्यामुळे त्यांना ही लढत देखील सोपी नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
-गणेश इंगवले – ८०८२०९७७७५