नवी मुंबई | देशी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या धोरणानुसार शनिवारी नवी मुंबईत पार पडलेल्या पहिल्या-वहिल्या आंतरराष्ट्रीय खो-खोच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ५ गुणांनी पराभव केला.
भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या इंग्लंडचा संघ तीन सामने खेळण्यासाठी भारताच्या दौर्यावर आला आहे. त्यापैकी पहिला सामना खेळविण्याचा मान नवी मुंबईला प्राप्त झाला. बोनकोडे श्रमिक शिक्षण मंडळ, अखिल भारतीय खो-खो असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत विरुध्द इंग्लंडमधील खो-खो सामन्याचे आयोजन कोपरखैरण सेक्टर ८ येथील रा.फ. नाईक विद्यालयाच्या मैदानात करण्यात आले होते. हा सामना खास मॅटवर खेळविण्यात आला. मैदानात क्रीडा रसिकांना बसण्यासाठी खास तयार करण्यात आलेली गॅलरी क्रीडा रसिकांनी तुडुंब भरली होती. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात हा उत्कंठावर्धक ऐतिहासिक सामना नवी मुंबईकरांनी अनुभवला.
या आंतरराष्ट्रीय सामन्याचे उदघाटन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. आपल्या मातीमधील खो खो सारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सामना नवी मुंबईत आयोजित केल्याबददल लोकनेते नाईक यांनी त्यांचे आणि श्रमिक शिक्षण मंडळाचे कौतुक केले. युवा खेळाडूंना या सामन्यामधून निश्चितच प्रेरणा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खो खोचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना भरविण्याचा मान नवी मुंबईला मिळाला याचा आनंद असल्याचे श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक म्हणाले. इंग्लंंडच्या संघाने चांगली कामगिरी केली असे नमूद करुन देशी खेळांना करियर म्हणून स्विकारण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, अखिल भारतीय ऑलंपिक महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता, अखिल भारतीय खो-खो संघटनेचे सचिव सुरेश शर्मा, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव डॉ.चंद्रजीत जाधव, इंग्लंड खो खो फेडरेशनचे प्रमुख ब्रीज हलदानिया, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक, नगरसेवकवर्ग, पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
टॉस जिंकून इंग्लंडच्या संघाने संरक्षण स्विकारले. भारतीय संघाने आक्रमण करीत पहिल्या फेरीत इंग्लडचे १५ खेळाडू टिपले. इंग्लंडने आक्रमण करताना भारताचे ११ खेळाडू बाद केले. मध्यतरांपर्यत भारताचे १५ आणि इंग्लंडचे ११ गुण झाले होते. सुरुवातीपासून भारताने सामन्यावर पकड ठेवली होती मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील कडवी झुंज दिली. दुसर्या फेरित भारताने इंग्लंडचे १० खेळाडू टिपलेे तर इंग्लंडने भारताचे ९ खेळाडू बाद करुन सामना जवळपास बरोबरीत आणला होता. शेवटी भारतीय संघाने आक्रमक खेळ करीत एकून २५ गुणांची कमाई केली तर इंग्लंडचे एकून गुण २० झाले होते. उत्कृष्ठ चढाया आणि संरक्षण यामुळे क्रीडा रसिकांच्या डोळयाचे पारणे फिटले. ५ गुणांच्या आघाडीने भारताने हा सामना जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. इंग्लंडच्या संघाचा कर्णधार दिलेश पटेल होता तर भारतीय संघाचा कर्णधार हर्षद हातणकर होता. रा.फ.नाईक विद्यालयाचा भारतीय संघातील खेळाडू संकेत कदम याने उत्कृष्ठ खेळ केला त्यांने इंग्लंडचे ९ खेळाडू बाद केले. इंग्लंडच्या संघातील आराम आणि रोहित हल्दानिया यांनी उत्तम खेळ करीत वाहवा मिळवली. बक्षिस वितरण लोकनेेते गणेश नाईक आणि इतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.