** नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच महिन्यात पत्रकारांवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना**
नवी मुंबई: डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि त्यांच्या मित्रावर मोटारसायकलवरुन आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी हॉकी स्टीक आणि लोखंडी रॉडने हल्ला करुन पलायन केल्याची घटना ३१ मार्च रोजी खारघर, सेक्टर-२१ मध्ये घडली आहे.
सदर हल्ल्यात सुधीर सुर्यवंशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खारघर मधील मेडीसीटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ते राहत असलेल्या पनवेल मधील कल्पतरु सोसायटीत गत महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या वादातून सदरचा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील चार ते पाच हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, नवी मुंबईत गत महिन्याभरात पत्रकारावर झालेला सदरचा दुसरा हल्ला असून यापूर्वी ‘झी-२४ तास’च्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि कॅमेरामन संदिप भारती यांच्यावर दिघा येथे वार्तांकन करताना २५ ते ३० जणांच्या हल्लेखोरांनी हल्ला केला होता.
डीएनएचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी पनवेलमधील कल्पतरू सोसायटीत राहण्यास आहेत. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुर्यवंशी त्यांच्या इमारतीत राहणारे संतोष खटाटे यांच्यासह खारघर, सेक्टर-२१ मध्ये कामानिमित्त गेले होते. यावेळी संतोष खटाटे यांनी आपली कार पार्क केल्यानंतर ते तेथील इमारतीत निघून गेले. काही वेळानंतर दोघेही कारजवळ आल्यानंतर त्यांच्या कारच्या पाठीमागील दोन्ही टायर पंक्चर झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सुर्यवंशी आणि त्यांचा मित्र टायरचे पंक्चर काढणार्याचा परिसरात पायी चालत शोध घेत होते. याचवेळी पाठीमागून दोन मोटारसायकलवरुन आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि त्यांचे मित्र संतोष खटाटे या दोघांवर हॉकी स्टीक आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी संतोष खटाटे यांनी सदर ठिकाणावरुन
पलायन केले. यावेळी सुधीर सुर्यवंशी यांनी मला का मारहाण करता? अशी हल्लेखोरांना विचारणा केली. मात्र, हल्लेखोरांनी काही एक न बोलता सुर्यवंशी यांना मारहाण करुन तेथून पलायन केले. सदर मारहाणीत सुधीर सुर्यवंशी गंभीर जखमी झाल्याने संतोष खटाटे याने तेथील नागरिकांच्या मदतीने त्यांना खारघर मधील मेडीसीटी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. सुधीर सुर्यवंशी यांचा उजवा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला असून या हल्ल्याची माहिती मिळताच ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ-२चे पोलीस उपआयुक्त राजेंद्र माने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी मेडीसिटी
हॉस्पीटलला भेट देऊन सुधीर सुर्यवंशी यांची विचारपूस केली.
दरम्यान, सदर हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुधीर सुर्यवंशी पनवेलमधील ज्या कल्पतरु सोसायटीत राहण्यास आहेत, त्या सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली असून या निवडणुकीत सुधीर सुर्यवंशी पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यावेळी सोसायटीच्या या निवडणुकीमध्ये त्यांचे इतर गटासोबत वादावादीचे प्रकार घडले होते. याच वादातून सदरचा हल्ला झाला असावा, अशी शक्यता सुधीर सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने तसेच इतर दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.