सुजित शिंदे / नवी मुंबई
३१ मार्च २०१७ रोजी खारघर येथे कामानिमित्त गेलेल्या दैनिक डीएनएA वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर काही लोकांनी भ्याडपणे प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार निंदनीय असून संताप आणणारा आहे व या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करीत असल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. सदर प्रकरणातील दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी मनसेने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या पत्रकारांवर असे जीवघेणे हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्याच महिन्यात वृत्तांकनासाठी गेलेल्या झी२४तास वाहिनीच्या पत्रकार व कॅमेरामन वर असाच जीवघेणा हल्ला दिघा येथे झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे मनसेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१ एप्रिल रोजी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हा हल्ला कोण्या व्यक्तीवर नसून हा हल्ला लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या संपूर्ण मिडीयावरचा हल्ला आहे. त्यामुळे उद्या एखाद्या कामानिमित्त गेल्यास पत्रकारांनी पोलीस सरंक्षण मागवून जावे का असा खडा सवाल मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे व दोषींवर कडक शासन करण्याची मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.