नवी मुंबई: नवी मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक जर ‘भारतीय जनता पार्टी’मध्ये पक्षप्रवेश करणार असतील तर त्यांचे पक्षात आरती ओवाळून स्वागत करु. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाने भविष्यात जर नवी मुंबई महापालिकेमध्ये ‘भाजपा’चा महापौर बनणार असेल तर आम्हाला आनंदच होईल, असे स्पष्ट मत ‘बेलापूर’च्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. आता ‘भाजपा’त येणे न येणे ते सर्वस्वी गणेश नाईक यांच्याच हाती आहे. दरम्यान, यासंदर्भात गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
गणेश नाईक यांचं मी त्यांची आरती घेऊन स्वागत करेन. यापूर्वी मीच त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घेऊन गेले होते. मात्र, राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांनी मलाच दगाफटका केला होता. पण तरीही मी त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी तयार आहे, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड खालसा होण्याची चर्चा रंगली होती. माजी मंत्री गणेश नाईक हे सहकुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आता मंदा म्हात्रे यांच्या विधानानंतर नाईक कुटुंबाच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे विधेयक नुकतेच विधी मंडळात मंजूर झाल्यामुळे नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे नियमित होताना प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे. गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे तमाम नवा मुंबईकरांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी ३ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचबरोबर नवी मुंबईतील सिडको निर्मित घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक झाली असून सदर काम ८० टक्के पूर्णत्वास आले आहे. ‘सिडको’ची घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात मसुदा तयार करण्याचे काम सिडको व्यवस्थापनाने हाती घेतले आहे. आगामी दोन महिन्यात सदर मसुदा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन तद्नंतर त्याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
याप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, कृष्णा पाटील, ‘युवा मोर्चा’चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, नगरसेवक दीपक पवार, विकास झंजाड, हरिश्चंद्र सुतार, दिलीप पाटील आदि उपस्थित होते.