नवी मुंबई: महानगरपालिका क्षेत्रातील पदपथ, रस्ते रहदारीला व वाहतुकीला खुले असावेत व नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमितपणे धडक कारवाई करण्यात येत असून आजही आठही विभाग कार्यालयांमार्फत अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली जोरदार कारवाई करण्यात येऊन अनधिकृत फेरीवाल्यांचे सामान जप्त करून क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले. यामध्ये महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या आठ विभागांतर्गत 900 हून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई कऱण्यात आली.
अनधिकृतरित्या कुठेही व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो तसेच रहदारीलाही अडथळा येतो. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असून यापुढील काळात अधिक प्रभावी रितीने धडक मोहीमा राबविण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांच्या सहा. आयुक्तांने देण्यात आलेले आहेत.