आगार अभियंत्यालादेखील कारणे दाखवा नोटीस
आज दुपारी तुकाराम मुंढे यांनी स्वारगेट आगाराला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी गाड्याच्या दुरुस्ती ठिकाणी आणि विविध कार्यालयांना भेट दिली. या दरम्यान मुंढे यांनी काही कागदपत्रे आणि तिकीटांचीही तपासणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या. यासोबतच मुंढे यांना ३ कर्मचारी गणवेशात आढळून आले नाहीत. या कर्मचाऱ्यांना मुंढे यांनी हजार रुपयांचा दंड आकारुन समज दिली. चालक आणि वाहक म्हणून नियुक्त झालेले ४ कर्मचारी आगारातील कार्यालयात काम करत असल्याची बाब समोर येताच मुंढे यांनी त्यांना मूळ ठिकाणी जाण्याचे आदेश दिले. ‘गाड्यांची अधिकाधिक दुरुस्ती करण्यात यावी. उत्पन्न वाढीकरिता सर्वांनी काम करावे. कामात सुधारणा कराव्यात,’ अशा सूचना यावेळी मुंढे यांनी आगार व्यवस्थापक आणि आगार अभियंत्याला दिल्या.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कामकाजाची वेळ साडेदहा ते साडेपाच ऐवजी एक तास वाढवून पावणे दहा ते पावणे सहा अशी केली. तर गुरुवारी कामावर उशीरा आलेल्या ११७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याची कारवाई केली. या कारवाईला कर्मचारी सामोरे गेलेले असताना दुसऱ्या दिवशी पाच कर्मचारी उशीरा आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
शनिवारी रात्रीच्या वेळी आगारामध्ये कर्तव्यावर असलेले ९ कर्मचारी झोपेत आढळल्याने त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. पुणे स्टेशन आणि कोथरुड आगारात गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले ९ कर्मचारी भरारी पथकाला झोपलेले आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात तुकाराम मुंढे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.