पूर्ण बातमी सांगितल्यावरच तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली
रायपूर | लाइव्ह बातमी देतानाच तिला समजले पतीचे झाले निधन, तरी आवरला भावनावेग निवेदिका सुप्रीत कौर ( सौजन्य आयबीसी २४) आपल्या भावनांपेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे असे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो परंतु छत्तीसगडमधील एका निवेदिकेने हे वाक्य अक्षरशः जगले आहे. आयबीसी २४ या वाहिनीसाठी काम करणाऱ्या सुप्रीत कौर या निवेदिकेला आजचा दिवस अगदी रुटीन होता. बातम्यांचे वाचन करण्याचे काम ती करत होती. त्याच वेळी वार्ताहाराने एका ठिकाणी अपघात झाल्याची ब्रेकिंग न्यूज असल्याचे सांगितले. पिथोरा या ठिकाणी एका कारला अपघात झाल्याचे त्याने सांगितले. या कारमध्ये पाच पैकी तीन जण ठार झाल्याचे त्याने तिला सांगितले. तसेच कारचा क्रमांक आणि अपघात कुठल्या रस्त्यावर झाला याची देखील त्याने माहिती दिली. ठार झालेल्या तिघांचे वर्णन त्याने सांगितले. त्यांचे वर्णन ऐकल्यावर आपला पती हर्शष कवाडे या अपघातात ठार झाला आहे याची तिला खात्री झाली. परंतु पूर्ण बातमी देईपर्यंत तिने आपले संतुलन ढळू दिले नाही. पूर्ण बातमी सांगितल्यानंतरच तिने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली असे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले.