योगेश शेटे / नवी मुंबई
बेलापूरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी वाशी येथे ‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत शनिवारी, ८ एप्रिल रोजी स्थानिक नागरिकांची भेट घेतली. नवी मुंबईतील घरे फ्री होल्ड करण्यासदर्ंभात काही दिवसांपूर्वी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक यांजसह बैठक झाली होती, त्या अनुषंगाने वाशी येथे नागरिकांशी सुसंवाद साधण्यात आला.
वाशी येथील सिडकोनिर्मित घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात तसेच पुनर्विकास या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. गेली अनेक वर्षे सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात मी प्रयत्नशील होते, तसे मी माझ्या निवडणुकीच्या वचननाम्यात देखील उल्लेख केला होता. सदर काम हे ८०% पूर्ण झाले असून सिडकोकडून त्यासंदर्भात मसुदा तयार करण्याचे काम प्राथमिक स्वरुपात सुरु झाले आहे. लवकरच मसुदा तयार करून तो राज्य शासनाकडे शासन निर्णयाकरिता पाठविण्यात येईल व त्याचे परिपत्रक काढण्यात येईल, असे बेलापुरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
भाजपा नेते व महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी फ्री होल्ड आणि अडीच एफ.एस.आय. साठी ताईंनी सातत्याने केलेला पाठपुरावा तसेच मंदाताईंची त्वरित कामकाज करण्याची जिद्द याविषयी नागरिकांना माहिती दिली. तसेच सदर संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी सदर संदर्भात आपल्या ज्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात सांगितल्यास मी त्या विभागाच्या संबधित अधिकारी यांना सुचविण्यात येतील असेही आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. वाशी येथे जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्य असे विरंगुळा केंद्र तसेच सुलभ स्वच्छता गृहे उभारणेकरिता रु. २५ लाख आमदार निधीची तरतूद करण्यात येईल, असेही आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी वाशी से-१७ येथील अनेक नागरिकांनी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना लेखी स्वरूपात आपल्या समस्यांसदर्ंभात निवेदने तसेच प्रभागातील तक्रारी सादर केल्या. वाशी येथील जेष्ठ नागरिक, महिला, रहिवाशी यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे स्वागत केले. ताईंच्या या उपक्रमामुळे येथील रहिवाश्यामध्ये आनंदाचे वातावरण असून यावेळी नागरिकांनी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांचे आभार मानले.
तत्पूर्वी वाशी सेक्टर-१७ येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान येथे ओपन जिमचे उद्घाटन बेलापूरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. वाशी येथील जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांना आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी, याकरिता ही ओपन जिम सुरु करण्यात आली असून योग वर्गही आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य शिबीर ही आयोजित करण्यात येतील, असेही आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांजसमवेत ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, भाजपा नेते संपत शेवाळे, नगरसेविका दयावंती शेवाळे, राम विचारे, विश्वरथ नायर तसेच वाशी मधील अनेक जेष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग तसेच परिसरातील हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष/सचिव पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते.