वागळे इस्टेट परिसरातील घटना
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली. यश खरात (वय १०) आणि प्रज्ञेश शिंदे (१५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुलुंडमधील अशोक नगर परिसरात राहणारी पाच शाळकरी मुले ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव येथे पोहोण्यासाठी आले होते. पाण्यात उतरली असता, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. पाचपैकी दोन मुले बुडाली. यश खरात (वय १०) आणि प्रज्ञेश शिंदे (१५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास केला असता, ही मुले मुलुंड येथील अशोक नगर परिसरातील असल्याची माहिती समोर आली. यश आणि प्रज्ञेश तलावात बुडाल्याचे पाहून घाबरलेल्या इतर तिघांनी तेथून पळ काढला, अशी माहिती समोर आली आहे.