नवी मुंबई / अनंतकुमार गवई़
विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांकरीता उत्तम काम केले जात असताना सन 2017-18 या वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी कर्करोग अर्थात कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे स्टोअर येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्रायोगिक तत्वावर कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी ईएनटी स्पेशालिस्ट, स्त्रीरोग तज्ञांमार्फत महिलांची प्राथमिक आरोग्य चाचणी करण्यात आली. त्या अंतर्गत ओरल कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याबाबत प्राथमिक चाचणी करण्यात आली. यामध्ये आढळून आलेल्या संशयित रुग्ण महिलांची याविषयीची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरीता महानगरपालिकेच्या वैद्यकिय अधिकारी, महिला आरोग्य सहाय्यक व आरोग्यसेविका यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत सोसायट्या व वस्त्यांमध्ये जाऊन कर्करोगाबद्दल जनजागृती व संवेदीकरण करण्यात येणार असून त्यामध्ये निवड करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात योणार आहे. हा महिलांच्या आरोग्याविषयीचा महत्वपूर्ण उपक्रम अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, समाजविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
तुर्भे स्टोअर येथे संपन्न झालेल्या शिबिराच्या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सायली शिंदे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या आरोग्य रक्षण, संवर्धनासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. सायली शिंदे यांनी हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी समिती सर्वोतोपरी काम करेल असा विश्वास देत या उपक्रमाचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले.