योगेश शेटे / नवी मुंबई
आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते. ती तळमळ मला संघर्षच्या सदस्यांमध्ये दिसते, अशी कौतुकाची थाप ज्येष्ठ निरूपणकार, तीर्थरूप, पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली.
संघर्ष समितीचे शिष्टमंडळ आज पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या दर्शनाला रेवदंडा येथे गेले होते. त्यावेळी संघर्षच्या उत्तुंग कामाची सगळे दखल घेत असल्याने कामाची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाविषयी तळमळ अंतरंगात असायला हवी. ती तुमच्याकडे आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला निश्चित यश येईल, असा आशीर्वादही त्यांनी कांतीलाल कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिला. तेव्हा संघर्षचे सारे सदस्य भरून पावले.
समाज चांगल्या कामाची दखल नेहमी घेत असते. तुमच्या कामात चांगलेपणा आहे, तो केवळ अंतरंगात असलेल्या समाजाविषयीच्या तळमळीमुळे मग यश नक्की पदरात पडेल. तुम्ही कार्यरत राहा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. अगदी मनमोकळेपणाने माहेरी आलेल्या लेकीशी पित्याने गप्पा माराव्यात तशा संघर्षच्या सर्व सदस्यांशी स्वारींनी संवाद साधला. त्यांच्या आश्वासक अमृतवाणीने सारे जण भारावून गेले होते.
संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना आज भेटीची वेळ दिली होती. परंती साम टिव्हीवर अचानक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविषयी बोला मुद्द्याचेमध्ये सहभागी व्हावे लागल्याने रेवदंडा येथे जाण्यास उशिरच झाला. त्यातच साम टिव्हीने अचानक विषय बदलून शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठीच्या संघर्ष यात्रेवर व्यक्त व्हावे लागले. हा निरोप तीर्थरूपांकडे पाठविला होता. तिथे पोहचताच आप्पासाहेबांनी याबद्दल कांतीलाल कडू यांना विचारले असता, त्यांनी सविस्तर माहिती दिली. तेव्हा आप्पासाहेबांनीही शेतकर्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी कर्जमाफी दिली पाहिजे, असे गप्पांच्या ओघात मत व्यक्त केले. त्यामुळे शेतकर्यांसाठीही ते मोलाचे आशीर्वाद ठरणार आहेत.
पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेलला चांगले काम केले आहे. त्यांची पनवेलला गरज असल्याचे सांगितले. संघर्षचे कार्य खूप जोमात सुरू आहे. त्याला यश येईल. तुमचे कार्य सुरूच ठेवा, असेही ते म्हणाले.
पनवेलच्या वडाळे तलावाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला असता येत्या महिन्याभरात सर्व्हे करून सुशोभिकरणासाठी जे जे करता येईल ते ते करेन, असे अगदी मायेने आणि आपुलकीने त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न भीषण आहे. विहिरी आणि तलाव स्वच्छतेच्या कार्याबद्दल कांतीलाल कडू यांनी अनोख्या कार्याला सलाम ठोकत, पनवेलच्या तलावाबद्दल आप्पासाहेबांकडून पुन्हा खूप अपेक्षा व्यक्त केल्या. तेव्हा एक महिन्यात सर्व्हे करून निर्णय घेऊ, असे सांगितले. वडाळे तलाव 40 एकर जागेत चिमाजी अप्पा यांनी पनवेलकरांसाठी निर्माण करून दिला होता, तो आता अल्पजागेत उरला असल्याची माहिती देताच सचिनदादा धर्माधिकारी यांनी आश्चर्य व्यक्त करून तलाव वाचविणे आणि सुशोभिकरण करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात कांतीलाल कडू, विजय काळे, माधुरी गोसावी, दमयंती म्हात्रे, कविता ठाकूर, पराग बालड, ऍड. किरण घरत, ऍड. संतोष सरगर, ऍड. आर. के. पाटील, संतोष शरद पवार, ओंकार खेडेकर यांच्यासह संघर्षच्या सदस्यांची उपस्थिती लाभली.