नवी मुंबई / साईनाथ भोईर
सन 2017-18 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके विभागनिहाय तयार करण्यात आलेली असून, सदर देयके मिळकतधारकांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे संबंधित विभाग कार्यालयामार्फतदेखील मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या पत्त्यावर ही देयके वितरीत करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरु करण्यात आलेली आहे.
विभाग कार्यालयनिहाय विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता कर संकलन केंद्रामध्ये मालमत्ता कर वसूल करण्याची कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, मिळकतधारक त्यांच्या मिळकतीचा मालमत्ता कर या संकलन केंद्रावर भरू शकतात तसेच महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही मालमत्ताकर ऑनलाईन (online) पध्दतीने जमा करु शकतात.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 अन्वये मालमत्ता कर आगाऊ देय (Due in advance) आहे. यामुळे सद्यस्थितीत सन 2017-18 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीचे बिल देय झाले आहे.
मिळकतधारकांना मालमत्ता कराचे बिल प्राप्त झाले नसल्यास संबंधित विभाग कार्यालयाकडील मालमत्ताकर विभागात संपर्क साधून बिलाची प्रत प्राप्त करून घेता येईल तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर ई-सुविधांखाली मालमत्ता कर (Tax payer can pay online Tax by cliking on Property tax under e-services) या आयकॉनवर क्लिक करून मिळकतधारक आपला मालमत्ता लेखा क्रमांक (अकाऊंट नं.) नमूद करून देयक पाहू शकतात व त्याची प्रिंटही काढू शकतात. त्यावर मालमत्ता कर भरावयाची रक्कम आपोआप दर्शविली जाईल. शिवाय त्याद्वारे मालमत्ताकर ऑनलाईन जमा देखील करता येईल. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरीता देय असलेला मालमत्ता कर विनाविलंब भरुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.