मुंबई : साईनाथ भोईर
दुष्काळाच्या प्रश्नावरून तसेच तुरडाळ खरेदी प्रश्नांवरून विरोधी पक्ष राज्य सरकारला एकीकडे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे राज्य सरकार ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्रावर व्यापक कार्य करताना बळीराजाला स्वबळावर सक्षमपणे उभे करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचे पहावयास मिळत आहे.
कृषीमालाला प्रथम प्राधान्य देताना राज्य सरकारने बी-बियाण्यापासून काम करण्यास सुरूवात केली आहे. बी-बियाण्यातील खासगी कंपन्यांची असलेली मक्तेदारी संपुष्ठात आणण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या चारही कृषी विद्यापिठांना बी-बियाण्यांच्या उत्पादनावर नवनवीन संशोधन करण्यास सांगितले आहे. कॉन्टेजिनिअस कंपनीच्या बी-बियाण्यांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. पूर्वी खासगी कंपन्यांच्या बी-बियाणे घेण्याविषयी शासन शिफारस करायचे,पण आता नजीकच्या काळात तशी परिस्थिती असणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या चारही कृषी विद्यापिठाकडे मुबलक प्रमाणावर जमिन असल्याने कृषी विद्यापिठाचे अधिकारी, प्राध्यापक व संशोधक यांना बी-बियाण्यांच्या उत्पादनांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. हवामानातील बदल शेतीला कसे पुरक ठरतील यावरही शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना स्वबळावर उभे करण्याचाच एक भाग म्हणून गुढीपाडव्यापासून राज्य सरकारकडून ‘समृध्दी शेतकरी योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी कायमस्वरूपी सधन व्हावा यासाठी खारपट्टा, कोरडवाहू शेती नुसार भाजीमालाचे व फळबागांचे प्रयोग सुरू झाले आहेत. ठिंबक सिंचन योजनेकरता कृषी विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे ५ हजार कोटीपेक्षा अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात सिताफळ व डाळींबाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. फूड प्रोसेसिंग, फळबागाबाबतही विशेष योजना राबविल्या जात आहेत. आधीच्या आघाडी सरकारने ठिंबकबाबतची अनुदाने वितरीत केली नाहीत. भाजपा सरकार सत्तेवर येताच तात्काळ ठिंबकची अनुदाने वितरीत करण्यात आली. निधी कमी पडल्यास अधिक निधी उपलब्ध करून देवू असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
बळीराजा कर्जमाफी व व्याजमाफी न देता त्याला स्वबळावर सक्षम केल्यास कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत या हेतूने भाजपा सरकार राबवित असलेल्या विविध योजनांमुळेच ग्रामीण भागातील शेतीचे चित्र लवकरच बदलणार असल्याचा दावा भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे.