सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई व महाराष्ट्रातील काही भागात स्वाईन फ्ल्यू आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचा प्रसार होऊ नये याकरीता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार प्रतिबंधात्मक जनजागृतीपर उपक्रम ठिकठिकाणी राबविले जात आहेत.
नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई व महाराष्ट्रातील काही भागात स्वाईन फ्ल्यू आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचा प्रसार होऊ नये याकरीता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार प्रतिबंधात्मक जनजागृतीपर उपक्रम ठिकठिकाणी राबविले जात आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित असलेली वाशी, ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालये, बेलापूर येथील माता बाल रुग्णालय, सर्व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वैद्यकीय अधिका-यांची सभा घेऊन त्यांना स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिका-यांचे याबाबत विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये स्क्रीनींग सेंटरमध्ये जास्तीत जास्त संशयीत रुग्णांचा शोध घेऊन संदर्भित करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व मुख्याध्यापक यांचेही मुख्यालय स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये यांचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांना स्वाईन फ्ल्यूच्या अनुषंगाने शाळा / महाविद्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करणारे परिपत्रक देण्यात आले आहे. जनतेमध्ये स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती पोहचावी याकरीता वर्तमानपत्रे, सोशल मिडीया याव्दारे सातत्यपूर्ण आवाहन करण्यात येत आहे. तसेच जनमाहितीपर 2 लाखाहून अधिक हस्तपत्रके वितरित करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.
या आजाराविषयी नागरिकांनी घाबरून जाऊ नये म्हणून गृह भेटीव्दारे तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत गटचर्चा घडवून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडे यासाठीचा आवश्यक औषध साठा व उपकरणे उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहेत. सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे 8 बेडचे आणि डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय नेरुळ येथे 5 बेडचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष संशयीत स्वाईन फ्ल्यू रुग्ण उपचारासाठी सुरु करण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिल 2017 पासून एकूण 33 संशयीत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 19 रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. या 12 पॉझिटिव्ह रूग्णांना रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उचित उपचार करण्यात आले असून यापैकी 7 रूग्ण पूर्णत: बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 5 रूग्ण रूग्णालयांत उपचार घेत असून त्यांची प्रकृती उपचारायोग्य आहे. या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील 38 व्यक्तींचीही तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.
स्वाईन फ्ल्यू हा विषाणूमुळे होणार आजार असून हा आजार असणा-या व्यक्तीशी संपर्क आल्यास एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीस होतो. ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसार, उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे असून हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हात सातत्याने साबण व पाण्याणे धुणे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळणे, खोकताना – शिंकताना तोंडाला रुमाल लावणे, भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे, पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.