नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासन तर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या वृक्ष लागवड मोहिम अंतर्गत एपीएमसी पोलीस स्टेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक-56 यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी गावातील गावदेवी मैदान मध्ये 7 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हवामानातील वाढत्या तापमानाचा धोका लक्ष्यात घेता जास्तीत जास्त झाडांची लागवड करणे आता काळाची गरज आहे. जास्त झाडांमुळे मानवी जीवाला मुबलक ऑक्सीजन मिळणार असून, वातावरणात गारवा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन यावेळी एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र गलांडे यांनी यावेळी केले.
जमीनीवर फक्त झाड लावले म्हणून नागरिकांची जबाबदारी संपत नाही. लावलेले प्रत्येक झाड आपले पाल्य समजून लावलेल्या रोपट्याचे संगोपन स्वतःच्या मुले-मुलींसारखे केले तरच आणि तरच वृक्षारोपण सार्थकी लागेल, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष परशुराम ठाकूर यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणले.
या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र गलांडे यांचे स्वागत परशुराम ठाकूर यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमास नगरसेविका सौ. उषाताई भोईर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, जेष्ठ नागरिक भगीरथ भोईर, वार्ड अध्यक्ष केशव ठाकूर, सीताराम सोनी, कोतावडेकर, अवतारसिंग बिंद्रा (काले), अक्षय ठाकूर, पांडुरंग खिलारे, नंदकुमार भोईर यांच्यासह एपीएमसी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.