सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई शहर वाढू लागले तशा आधुनिक काळास अनुसरून नागरिकांची बदलत्या अपेक्षा जाणून घेत नवी मुंबई महानगरपालिकेनेही तशा प्रकारच्या आधुनिक सुविधा पुरविण्यास सुरूवात केली असून जुईपाडा गाव व परिसरातील नागरिकांच्या लग्न समारंभ व विविध कार्यक्रमांसाठी एक अत्यंत चांगले प्रशस्त वातानुकूलित सभागृह उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी या वास्तूचा वापर नागरिकांनी आपली वास्तू म्हणून नेटकेपणाने करावा असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 23, जुईपाडा गाव येथील बहुउद्देशीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापौर महोदयांसमवेत व्यासपिठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदा म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील, ब प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. रूपाली किस्मत भगत, स्थानिक नगरसेविका तथा उद्यान व शहर सुशोभिकरण समितीच्या सभापती श्रीम. तनुजा मढवी, परिवहन समिती सदस्य श्री. काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका श्रीम. माधुरी सुतार, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे, माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री. चाहू मढवी, माजी परिवहन समिती सद्स्य श्री. अनंत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्रीम. मंदा म्हात्रे यांनी गावातील नागरिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी महानगरपालिकेने मोठ्या हॉलच्या रूपाने एक चांगली सुविधा गुरूपौर्णिमेच्या दिवशी उपलब्ध करून दिली असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत नागरिकांनी विशेषत्वाने महिला भगिनींनी या सुविधेचा आप्लया विविध उपक्रमांसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
स्थानिक नगरसेविका तथा उद्यान व शहर सुशोभिकरण समितीच्या सभापती श्रीम. तनुजा मढवी यांनी ही बहुउद्देशीय इमारत नागरिकांकरिता कार्यक्रमांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार असून महानगरपालिकेमार्फतच या वास्तूची देखभाल केली जावी व या वास्तूला गावदेवीचे नाव देण्यात यावे अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली.
सेक्टर 23, जुईपाडागाव येथील महानगरपालिकेच्या जनार्दन पाटील विद्यालय इमारतीच्या पाठीमागील बाजूस 4 कोटी 86 लक्ष खर्च करून उभारण्यात आलेल्या या एक मजली बहुउद्देशीय वास्तूत तळमजल्यावर 395 चौ.मी. चे पार्कींग क्षेत्र असून प्रसाधनगृह व्यवस्था आहे. एकूण 14 चार चाकी आणि 7 दोन चाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर 555.25 चौ.मी. क्षेत्रफळाचे प्रशस्त वातानुकूलित सभागृह असून दोन चेंजींग रूम आणि प्रसाधनगृह व्यवस्था आहे.