सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणार्या नववीतील विद्यार्थ्यांना अद्यापि पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले नसल्याची बाब युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपअधिकारी निखिल मांडवे यांनी उजेडात आणली असून याप्रकरणी दोषी असणार्या व्यक्तिंवर कठोर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त व महापालिका शिक्षणाधिकार्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून माध्यमिकचे वर्ग चालविले जात आहे, ही खरोखरीच स्तुत्य बाब आहे. कारण महापालिका प्रशासनाला प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे, माध्यमिक शिक्षण बंधनकारक नाही. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन केवळ माध्यमिक शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे, शाळेचा दहावीचा निकालही गेल्या काही वर्षात चांगल्या स्वरूपाचा येत आहे. परंतु यंदाच्या वर्षी शाळा सुरू होवून महिना उलटला तरी अद्यापि महापालिका शाळेच्या नववीच्या मुलांना पुस्तके प्रशासनाकडून उपलब्ध झालेली नाहीत. मुले व त्यांच्या पालकांकडून पुस्तके न मिळाल्याची तक्रार एकीकडे करण्यात येत असतानाच दुसरीकडे शाळेत चौकशीसाठी गेले असता, पुस्तके उपलब्ध असल्याचे उर्मटपणे सांगण्यात येते. बोलण्यात काडीमात्रही सौजन्य दाखविले जात नाही. पुस्तके मिळाली असती तर त्या त्या महापालिका शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी कशाला खोटी तक्रार केली असती. अनेक विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, अद्यापि पुस्तकेच मिळाली नसल्याचे सांगण्यात आले असल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पुण्यापाठोपाठ नवी मुंबईला विद्येचे माहेरघर संबोधले जात आहे. महापालिका शाळेचा शैक्षणिक दर्जाही उच्चत्तम स्वरूपाचा आहे. विद्यार्थ्यांना मिळत असलेले यश हे शिक्षकांच्या परिश्रमाची पोचपावती आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु आता शाळा सुरू झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये नववीच्या मुलांच्या परिक्षा होतात. त्यामुळे पुस्तकेच मिळाली नाही तर मुले या कमी कालावधीत काय अभ्यास करणार आणि शिक्षकही अभ्यासक्रम केवळ आटोपता घेण्याचेच काम करणार. या पार्श्वभूमीवर आपण तातडीने या शैक्षणिक समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महापालिका शाळेतील इयत्ता नववीचे शिक्षण घेणार्या मुलांच्या पुस्तक वितरणास झालेल्या विलंबाची युध्दपातळीवर चौकशी करावी. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पुस्तक विलंबप्रकरणी दोषी असणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी निखिल मांडवे यांनी केली आहे.