स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नेरूळ येथे दोन लाखांची घरफोडी सोन्या-चांदीचा ऐवज लुटला
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दहाचा एलआयजी परिसर हा प्राधान्याने मराठी बहूल श्रमिकांचा विभाग. या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून सतत चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत असल्याने हा परिसर भुरट्या चोरांच्या विळख्यात अडकल्याचे पहावयास मिळत आहे. एकाच आठवड्यरात या परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडल्याने भुरट्या चोरांनी नेरूळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नेरूळमधील सेक्टर 10 येथील अण्णाभाऊ रहिवासी संघ येथे रहाणारे संजय बाळाराम बोरकर (38) हे आपल्या कुटूंबीयांसह मानखुर्द मुंबई येथील त्यांच्या आई-वडिलांकडे गेले असता त्यांच्या घरातून काही रकमेसह सुमारे दोन लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळमधील सेक्टर 10 येथील अण्णाभाऊ रहिवासी संघाच्या वसाहतीत संजय बोरकर हे पत्नी नलिनी व एक वर्षांच्या मुलीसह रहातात. संजय बोरकर हे त्यांच्या कुटूंबासह दि. 25 जुलै रोजी त्यांच्या आजीच्या वर्षश्राद्धनिमित्त मानखुर्द येथे गेले होते. बोरकर कुटूंबीय दोन दिवस चेंबूरमध्येच वास्तव्याला होते. दि. 28 जुलै रोजी दुपारी 12.15 वाजता संजय बोरकर यांचा मोठा भाऊ रोहिदास बोरकर यांनी त्यांना फोन करून तुझ्या घराचा कडीकोयंडा कोणीतरी तोडला असल्याचे शेजार्यांनी कळवल्याचे सांगितले. त्यानंतर संजय बोरकर यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला व लोखंडी कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यात दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅमचे झुमके, दोन तोळ्याच्या बांगड्यांचा सेट, पाच ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन, एक ग्रॅमच्या छोट्या अंगठ्या, आठ तोळे वजनाचे चांदीचे पैंजन, दोन तोळे वजनाचा चांदीचा कमरपट्टा, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे लॉकेट व काही रक्कम अशी एकूण 1 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.