स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : संततधार पाऊस नवी मुंबईत पडत असल्याने धोकादायक वृक्षांची पडझड होवून जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व काँग्र्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यात 226 झाडांची पडझड झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा संपूर्ण पावसाळ्यात 189 होता. सिमेंटचे जंगल म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबईत झाडांची मुळे खोलवर रुजत नसल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात 226 झाडे पडली आहेत. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या वृक्षगणनेनुसार नवी मुंबईत 8 लाख 57 झाडे आहेत. त्यात सुबाभूळ आणि गुलमोहराची संख्या जास्त आहे. ही झाडे छोट्याशा वादळानेही कोलमडून पडतात, असे वृक्ष अभ्यासकांचे म्हणणे आहे. पावसाळा अजून दोन महिने बाकी असल्याने अजूनही मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड होण्याची दाट शक्यता आहे. अनेकदा सोसायटी आवारातील, पदपथावरील, रस्त्यालगतच्या झाडांची पडझड झाल्यास मोठ्यरा प्रमाणावर जिवित व वित्त होण्याची भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य व सुरू असलेला पावसाळा लक्षात घेता आपण युध्दपातळीवर नवी मुंबई कार्यक्षेत्रातील झाडांचा पालिका यंत्रणेमार्फत आणि वेळ पडल्यास खासगी यंत्रणेमार्फत सर्व्हे करावा. ज्या ठिकाणची वृक्ष धोकादायक असतील आणि धोकादायक वृक्षांबाबत स्थानिक रहीवाशांनी मागणी केली असेल त्या झाडांची तातडीने छाटणी करून संभाव्य धोका टाळण्यास मदत करावी, असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.