स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : ग्राहकांशी सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनीने नवी मुंबईत सुरू केलेले जनजागृती मेळावे ही स्तुत्य व अभिनंदनीय बाब आहे. परंतु महावितरणकडून या मेळाव्याची माफक प्रमाणात जनजागृती केली जात नसल्याने वीज ग्राहकांना या मेळाव्याची माहिती होत नाही आणि मेळाव्याचा हेतू सफल होत नाही. त्यामुळे अशा स्वरूपात मेळावे आयोजित करताना महावितरणने जनजागृतीवर प्राधान्याने भर द्यावा असे प्रतिपादन महापालिका प्रभाग 95, नेरूळ गावचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केले.
नवी मुंबई शहरातील वीजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या प्रामुख्याने सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने नेरूळमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मेळाव्याची जनजागृती होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहक या मेळाव्याला मुकत असल्याची नाराजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली. नेरूळमधील महावितरणच्या वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नेरूळ सेक्टर 12 मधील गांवदेवी मंदिराजवळ महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनीच्या नेरूळ पामबीच उपविभागातर्फे आयोजन करण्यात आले होत. या मेळाव्यात ग्राहकांनी मांडलेल्या समस्यांचेच व तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन महावितरणचे विभागिय अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोपान पवार, सहाय्यक अभियंते जितेंद्र पाटील यांनी दिले.