पीकविमा योजनेत नियोजन नसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
मृत शेतकरी रामा पोत्रे यांच्या कुटुंबियांना काँग्रेस पक्षाकडून 50 हजारांची मदत
भोकर : भोकर तालुक्यात झालेला शेतकऱ्याचा मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पीकविमा भरण्याची मुद्दत १० दिवसांनी वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भोकर तालुक्यातील दिवशी (बु) येथील शेतकऱ्याचा किनी येथे बँकच्या रांगेत मृत्यू झाल्यानंतर रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना 50 हजारांची मदत केली त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँक शाखेसमोर पीकविमा भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतक-यांची भेट घेतली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यानंतर त्यांनी बँक व महसूल कर्मचा-यांना सर्व शेतक-यांचा पीकविमा भरून घेण्याची सूचना केली.
यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, झालेली दुर्घटना दुर्दैवी असून शासनाने पीकविमा योजनेचे योग्य नियोजन केले असते तर अशी घटना घडली नसती. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असून घटने विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून मयत कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लक्ष रुपयांची मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार आहे याची चौकशी होवून गुन्हा दाखल झाला पाहिजे असे खा. चव्हाण म्हणाले.
संपुर्ण महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. वीज नाही, ऑनलाईन मध्ये व्यत्यय आहे. सरकारने योग्य नियोजन न करताच पीकविमा जाहिर केली. व अल्पावधीत शेतकऱ्यांना बँकेच्या रांगेत उभे केले. याआधी अशाच प्रकारे नोटबंदीचा निर्णय घेऊन जनतेला दोन महिने रांगेत उभे केले. त्याही वेळी निष्पाप नागरीकांचा नाहक बळी गेला. आताही योग्य नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांचा बळी जात आहे. प्रशासनाने व बँक व्यवस्थापनाने पीकविमा भरण्याचे योग्य नियोजन करावे. शेतकऱ्यांचे अर्ज ऑफ लाईन पद्धतीने घ्यावेत. पीकविमा भरण्यासाठी येणा-या अडचणींबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
यावेळी खा.अशोक चव्हाण यांच्या सोबत बी.आर.कदम, नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, उपाध्यक्ष गोविंद बाबा गौड, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर,जि.प.सदस्य बाळासाहेब रावणगावकर, बाजार समितीचे संचालक सुभाष किन्हाळकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.