नवी मुंबई / प्रतिनिधी
21 व्या शतकातील शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या नवी मुंबई शहरातील घणसोली नोडला आजही अघोषित भारनियमनचा सामना करावा लागत आहे. वीज विभागाशी वारंवार बैठका घेवूनही तोडगा निघत नसल्याने ऐरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात ताराकिंत प्रश्नाद्वारे पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून या समस्येला वाचा फोडली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपकेंद्रासाठी प्रयत्न सुरू असून जागा उपलब्ध होताच या समस्येवर तोडगा काढणे शक्य होणार असल्याचे उत्तर खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना द्यावे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईकांना महाराष्ट्रातील राजकारणात नवी मुंबईचा ओबामा याच नावाने ओळखले जात आहे. सातत्याने मतदारसंघातील समस्या सोडविताना व्यस्त असल्याने अलिकडच्या काळात नवी मुंबईकर संदीप नाईकांचा नवी मुंबईचे विकासपर्व असा उल्लेख करू लागले आहेत.
नवी मुंबई विकसित व सुविधायुक्त झाली असली तरी घणसोली नोड अद्यापि विकासांच्या व सुविधांच्या बाबतीत बकाल आणि मागासलेलाच राहीलेला आहे. नुकताच घणसोली नोड सिडकोकडून महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आला असला तरी सिडकोने निधी न दिल्याने घणसोली नोडमधील विकासकामांना गती मिळालेली नाही. घणसोली नोड गेल्या काही वर्षापासून वीजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाला असून अघोषित भारनियमनाचा त्यांना सातत्याने सामना करावा लागत आहे. या समस्या निवारणासाठी आमदार संदीप नाईकांनी सातत्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे पाठपुरावा केलेला आहे. बैठकाही घेवून समस्येच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याचा संदीप नाईकांनी सतत प्रयत्नही केलेला आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही घणसोली नोडची भारनियमनाची समस्या संपुष्ठात येत नसल्याने अखेरिला आमदार संदीप नाईकांनी सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात ताराकिंत प्रश्न मांडत या समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या भारनियमानाबाबत सुरू असलेल्या प्रकाराची विचारणा करत हा प्रकार कधी संपुष्ठात येणार असल्याची विचारणा आमदार संदीप नाईकांनी ऊर्जा विभागाकडे केली.
संदीप नाईकांनी घणसोली नोडमधील भारनियमनाच्या समस्येकडे विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधल्यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणसोली नोड व सभोवतालच्या परिसरातील नागरीकरणाची प्रक्रिया वाढत असून वीजेची मागणीही वाढत असल्याचे मान्य केले. घणसोली फिडरची लांबी अंदोजे 14 किलोमीटरची असून त्यात सध्या अतिरिक्त लोड असल्यामुळे तळवली भागातील रहीवाशांना वीजेच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी लेखी उत्तरामध्ये मान्य केले आहे. घणसोली परिसरात स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याबाबत लागणार्या जागेची मागणी सिडको कार्यालयास महावितरणच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जागा उपलब्ध झाल्यास प्रस्तावित उपकेंद्राच्या कामास सुरूवात करणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
आपल्या मतदारसंघातील भारनियमनाच्या समस्येकडे विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधून घेणारे आमदार संदीप नाईक पुन्हा एकवार नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसनीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. वाचाळ चर्चेतून वादग्रस्त न बनता कामाच्या माध्यमातून चर्चेत राहणारा आमदार आम्हाला लाभला असल्याची प्रतिक्रिया ऐरोलीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.