पतंजली परिवाराचा उपक्रम
पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईज आणि पतंजली परिवार यांच्या माध्यमातून वनौषधींची लागवड आणि संवर्धनाचा संकल्प रविवारी (दिनांक ३० जुलै) करण्यात आला. विविध प्रकारची सुमारे ११०० वनऔषधी रोपांची लागवड पनवेल परिसरात करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
पतंजली परिवाराचे आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात सुमारे ५००० तर पनवेल परिसरात १००० च्या वर वनौषधी रोपांची लागवड करण्यात येत आहे. केवळ लागवड करून न थांबता या रोपांचे संवर्धन करण्याचे काम रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात आदई येथील निर्मिती फार्म येथून करण्यात आली. या परिसरात १०० वनौषधींची लागवड करण्यात आली. तसेच आदई डोंगरालगतही १०० वनौषधींची लागवड करण्यात येतील. वावंजे नजीक महाळुंग येथे २०० झाडे सांगुर्ली येथील डोंगराळ भागात ५०० तसेच कामोठे आणि तळोजा येथे कांही रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला पतंजली परिवाराचे आर पी यादव,रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडेंट मदन बडगुजर,निर्मिती फार्मचे गणेश भोपी,रोटेरिअन डॉ दीपक खोत,मधुकर नाईक,शैलेश अक्कलकोटे यांच्यासह पतंजली परिवाराचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अपक्रमांतर्गत करंज,खैर,बेहरडा,आपटा,बहावा,बेल आणि कंडोल या वनौषधी झाडांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षरोपण न करता या दुर्मिळ तसेच औषधीयुक्त झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. रोटरीचे सदस्य दरआठवड्याला वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी भेट देऊन या वृक्षांची निघा राखणे आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहेत. वृक्षारोपणाचे महत्व काय असते याची माहिती आर पी यादव यांनी यावेळी दिली तर वनौषधींच्या गुणांची माहिती रोटेरिअन मदन बडगुजर यांनी दिली.