ठाणे : लोकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाला पूरक ठरेल, असा कारभार करणे हेच भाजपाचे महापालिका निवडणुकीतील प्रमुख उद्दिष्ट असून त्याची मतदारांना पुर्ण कल्पना असल्याने मीरा भाईंदरचे मतदार भाजपला एकहाती सत्ता सोपवतील असा विश्वास आ. नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे. तसेच निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेसाठी आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज लागणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई, कल्याण – डोंबिवली, नाशिक या महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पनवेल महापालिकेत तर भाजपने स्वबळावर सत्ताही काबिज केली आहे. त्याचा संदर्भ देत नरेंद्र मेहता म्हणाले की, मीरा भाईंदरमहापालिकेतही स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात भाजपाला कोणतीही अडचण येणार नाही. काही नेते हे जणु मीरा भाईंदर शहर आपल्या मालकीचे असल्याचा आव आणत असले, तरी मतदार अशा स्वयंघोषित मालकांना त्यांची जागा दाखवून देतील. या उलट भाजपाची भुमिका ही जनतेच्या सेवकाची असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेणे पसंत करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या शिवाय आपल्या नगरसेवक, महापौर आणि गेल्या तीन वर्षांतील आमदारकीच्या कारकिर्दीत शहरासाठी केलेल्या कामांची दखल मतदार जरूर घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी देखील पारदर्शक कारभार आणि विकास कामांची ग्वाही मीरा भाईंदरकरांना दिलेलीच आहे. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे मीरा भाईंदरमहापालिकेतील मतदार भाजपाकडे मोठ्या विश्वासाने सत्ता सोपवतील, याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंका नसल्याचे ते म्हणाले.