मुंबई : धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासातील खोलीचं छत दोन दिवसापूर्वीच कोसळलं. सुदैवाने छत कोसळलं त्यावेळी खोलीत कोणीच नसल्याने मोठी हानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दक्षिण मुंबईत विधान भवन परिसरात मनोरा आमदार निवास आहे. आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रुम नंबर ११२ मध्ये राहतात. या खोलीतील अँटी चेंबरमधील छत पीओपीसहित कोसळलं. छत कोसळलं त्यावेळी रुममध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
दरम्यान, मनोरा आमदार निवास २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. या इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये वर्षभरापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार ही इमारत धोकादायक असल्याचं पुढे आलं होतं. यापूर्वीही आमदार निवासातील एका खोलीत छत कोसळलं होतं.