नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेचा अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांवर कारवाई करताना पक्षपातीपणा करतात. काही फेरीवाल्यांवर कारवाई होते तर काही फेरीवाल्यांना अभय दिले जाते. अतिक्रमणच्या कारवाईचा फेरीवाल्यांना आधीच सुगावा लागत असल्याने कारवाईचा केवळ देखावा असतो, अशा संतप्त भावना नेरूळमधील नगरसेविका व नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकीत व्यक्त करत असताना पालिका अधिकार्यांनी काही फेरीवाले नातेवाईक असतात, त्यामुळे त्यांना सोडावे लागते असे उत्तर दिले. जबाबदार पालिका अधिकार्यांकडून बेजबाबदारपणाचे उत्तर येताच सभागृहनेते जयवंत सुतारांसह अन्य नगरसेवकांनी त्या अधिकार्याचे भर बैठकीत वाभाडे काढले.
प्रभाग 87च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नुकताच प्रभाग समितीच्या बैठकीत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. आधीच सेक्टर 8 येथील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीजच्या अतिक्रमणावर पालिका कारवाई करत नसल्याने स्थानिक रहीवाशांकडून पालिका प्रशासनाप्रती गेल्या काही वर्षापासून संतप्त सूर आळविला जात आहे. त्यातच काही दिवसापूर्वी पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने नेरूळ सेक्टर 8 परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका मराठी भाषिक महिलेवर कारवाई करताना त्यांच्याशेजारी असलेल्या परप्रातिंय व्यापार्यांना अभय दिल्याने परिसरातील रहीवाशी पालिकेच्या कारवाईबाबत उलटसूलट चर्चा करत आहेत.
प्रभाग समितीच्या बैठकीत नेरूळ सेक्टर 8 व 10 मध्ये फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाबाबत नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नाराजी व्यक्त केली. अतिक्रमण विभाग एकावर कारवाई करताना त्यालगत बसलेल्या अन्य फेरीवाल्यांकडे कानाडोळा करत अभय दिले. हाच मुद्दा नगरसेविका सुनिता मांडवे यांनी उपस्थित करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होणार्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात होणार्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईच्या प्रामाणिकपणाविषयी संशय व्यक्त केला. यावर उत्तर देताना पालिका अधिकार्यांनी काही फेरीवाले नातेवाईक असल्याने असे करावे लागत असल्याचे सांगितले. पालिका अधिकार्यांकडून असे बेजबाबदारपणाचे उत्तर मिळताच प्रभाग समितीच्या बैठकीला उपस्थित असणारे सर्वपक्षीय नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी या बेजबाबदार उत्तराबद्दल पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
फेरीवाल्यांकडून पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाला हफ्ते मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नवी मुंबईकरांकडून होत असतानाच आता फेरीवाले नातेवाईक असल्याने कारवाई होत नसल्याचे उत्तर पालिका प्रशासनाकडून मिळाले आहे. आयुक्तांचा व सत्ताधार्यांचा तसेच विरोधी पक्षांचा पालिका प्रशासनावर धाक राहीला नसल्याने असे उत्तर देण्याचे धाडस पालिका अधिकार्यांचे वाढीस लागले असल्याची चर्चा नवी मुंबईकरांत सुरु झाली आहे.