दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रसिद्ध अशा छावा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना नव्याने येणार्या एका चित्रपटात प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. सध्या हे विद्यार्थी हिंदी सिने अभिनेत्री कंगना राणावत व इतर कलाकारांना प्रशिक्षण हैद्राबाद येथील स्टुडिओ देत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व प्रशिक्षक अमित गडांकुश यांनी दिली.
नवी मुंबईतील छावा प्रतिष्ठाण ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून लाटी, काठी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा विविध प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण देत आहे. नव्याने येणार्या मनकर्णिका द क्वीन ऑफ द झाशी या झाशीच्या राणी वर आधारित असणार्या हिंदी चित्रपटासाठी मुंबई येथील मेहबूब या स्टुडिओमध्ये संस्थानी ऑडिशन दिले. त्यामध्ये छावा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्याना चित्रपटात प्रशिक्षण देण्यास नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये छावा प्रतिष्ठानचे प्रशिक्षक अमित गडांकुश, हर्षदा सुतार, ज्योती कोंढाळकर, मृदुला गायकवाड, अमृता दळवी यांचा समावेश आहे.
हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये हे विद्यार्थी कलाकारांना प्रशिक्षण देत आहेत. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध हिंदी नायिका कंगना राणावत प्रमुख नायिकेची भूमिका बजावत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते कमल जैन,स्टंट दिग्दर्शक निक पॉवेल हे आहेत.
पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर नवी मुंबईतील विद्यार्थ्याना प्रशिक्षणाची संधी मिळाल्यामुळे छावा प्रतिष्ठानचे विद्यार्थी खुश असल्याचे अमित गडांकुश यांनी सांगितले.