मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंविरूद्ध राज्यपालांनी केलेली कारवाई स्वागतार्ह असली तरी ही कारवाई अधिक कठोर असायला हवी होती, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना रजेवर पाठविल्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, कुलगुरूंच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाला अक्षम्य विलंब झाला आहे. त्यामुळे अकार्यक्षम कुलगुरूंना तातडीने पदमुक्त करून एखाद्या सक्षम व्यक्तीकडे विद्यापीठाचा प्रभार सोपविण्याची आमची मागणी होती. त्यानुसार ही कारवाई यापूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु, कुलगुरूंना केवळ रजेवर पाठवून चालणार नाही. कारण त्यांच्या कार्यकाळात झालेल्या मूल्यांकनाचा दर्जा अत्यंत वाईट असून, त्यामुळे अभ्यासू मुलांवर मोठा अन्याय झाला आहे. सरकारने विद्यापीठाच्या मूल्यांकनाचा दर्जा तपासून त्यानुसार कुलगुरूंना सेवेतून बडतर्फ करावे, अशीही मागणी विखे पाटील यांनी केली.