मुंबई : औरंगाबाद शहरात होणा-या पोलीस रजनी कार्यक्रमाच्या प्रत्येकी 51 हजार रूपये किंमतीच्या तिकीटांची पोलीस जबरदस्तीने विक्री करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, औरंगाबाद येथे 16 ऑगस्ट 2017 रोजी पोलीस रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. औरंगाबाद पोलीस सहआयोजक असलेल्या या पोलीस रजनी कार्यक्रमाचे तिकीट दर प्रति तिकीट 51 हजार रूपयांचे असून माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार औरंगाबादमधील 15 पोलीस ठाण्यांना तिकीट विक्री करण्यास सांगितले आहे. तिकीट विक्रीच्या लक्ष्याची पूर्तता करण्यासाठी पोलिसांनी असामाजिक तत्वे व अवैध धंदे चालकांना तिकीट विक्री केल्याचे समजते. हे अतिशय धक्कादायक असून औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी या संदर्भात तात्काळ स्पष्टीकरण द्यावे तसेच कोणाच्या आदेशाने पोलिसांना तिकीट विक्रीची जबाबदारी देण्यात आली, हे ही जनतेला कळाले पाहिजे असे सावंत म्हणाले.