नवी मुंबई : महानगरपालिका स्थायी समिती सदस्यांकरिता स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘स्थायी समिती रचना व कामकाज’ या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या विभागीय संचालिका डॉ. विद्या कादवडकर आवर्जुन उपस्थित होत्या.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सचिव श्री. नारायण पठाडे यांनी स्थायी समिती रचना सभा नियम व कामकाज या विषयावर व्याख्यान दिले. त्याचप्रमाणे स्थायी समितीच्या अधिकारांबाबत माहिती दिली.
दुस-या सत्रात स्थानिक निधी लेखा परीक्षणाचे सेवानिवृत्त संचालक श्री. रविन्द्र भागवत यांनी अर्थसंकल्पीय तरतूदी तसेच कलम 73 अंतर्गत संविदांबाबत अधिनियमातील तरतूदींविषयी माहिती व त्यांच्या वापराविषयी विस्तृत विवेचन केले. दोन्ही वक्त्यांनी उपस्थित स्थायी समिती सदस्यांशी सुसंवाद साधत विविध गोष्टींविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले.