नवी मुंबई : शहराचा स्वच्छतेत देशात आठवा आणि राज्यात पहिला क्रमांक असून यामध्ये प्रत्येक नागरिकाचे मोलाचे योगदान आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान लाभावा या दिशेने आपली वाटचाल सुरू असून सुखकर्त्या गणेशाकडे आपले हेच मागणे असल्याचे सांगत महापौर सुधाकर सोनवणे यांनी गणेशोत्सव मंडळांनी यादृष्टीने जनजागृतीत हातभार लावावा व इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मागील वर्षीच्या ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2016’ पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी मंचावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती विशाल डोळस व उपसभापती रमेश डोळे, ब प्रभाग समिती अध्यक्ष रूपाली किस्मत भगत, ड प्रभाग समिती अध्यक्ष संगिता बो-हाडे, इ प्रभाग समिती अध्यक्ष संगीता म्हात्रे, जी प्रभाग समिती अध्यक्ष संजू वाडे, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती शिल्पा कांबळी, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती अंजली वाळुंज, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती प्रज्ञा भोईर, नगरसेवक गिरीश म्हात्रे, हेमांगी सोनवणे, वैजयंती भगत, शशिकला पाटील, सीमा गायकवाड, परिवहन समिती सदस्य राजू शिंदे आदी उपस्थित होते.
महापौरच्या शुभहस्ते नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा बहुमान तुर्भेच्या शिवछाया मित्र मंडळाने पटकावला. नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ, सोनखार-सानपाडा हे व्दितीय क्रमांकाचे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ से.9 ए, 10 ए वाशी हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. लोकमान्य सेवा समिती सेक्टर 4 ऐरोली तसेच सानपाड्याचा महाराजा सार्व.गणेशोत्सव मंडळ सेक्टर 10 सानपाडा यांना दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रक्कम आणि स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र स्वरूपात प्रदान करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट देखावा गटात अखिल दिवा ऐरोली सार्व.गणेशोत्सव मंडळ सेक्टर 8 ऐरोली, समाज प्रबोधनात्मक विषयानुरूप सजावट गटात लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती सेक्टर 10 नेरूळ, आकर्षक मूर्ती गटात ऐरोली रहिवासी सेवा संघ, शिवकॉलनी सेक्टर 1 ऐरोली तसेच स्वच्छता शिस्तबध्दता गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर ४-५ वाशी ही मंडळे सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. प्रत्येक गटात अनुक्रमे तीन व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिके रक्कमेसह स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र स्वरूपात प्रदान करण्यात आली. ई गव्हर्नन्सच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल करीत मंडळाच्या पारितोषिक रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. याशिवाय गतवर्षीच्या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना सहभाग प्रमाणपत्रे व स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका 1996 पासून सातत्याने गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा आयोजित करीत असल्याचे सांगून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सभापती श्री.विशाल डोळस यांनी मागील वर्षी स्पर्धेत 73 मंडळे सहभागी झाली होती, यावर्षी यापेक्षा अधिक उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
गतवर्षीच्या स्पर्धेचे परीक्षण करणारे नाट्यकलावंत अशोक पालवे, चित्रकार केदार शिंदे, पत्रकार ज्ञानेश्वर जाधव या परीक्षकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सुप्रसिध्द गायक संतोष चौधरी अर्थात दादुस यांनी याप्रसंगी आई एकविरेचे लोकगीत गायन करून कार्यक्रमात रंग भरला.
यावर्षीच्या सन 2017च्या स्पर्धेमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने ठरविले असून 21 ऑगस्टपर्यंत आपल्या नजिकच्या महानगरपालिका विभाग कार्यालयात मंडळांनी अर्ज दाखल करावा असे आवाहन करण्यात येत आहे.