स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नवी मुंबई: कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाची पॉलिट ब्युरो आणि समाजसुधारणांची बैठक नेरुळ येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यामध्ये शिवसेना नगरसेवक तथा माजी सिडको संचालक नामदेव भगत यांची दुसर्यांदा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
याशिवाय कोळी महासंघाच्या कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी डॉ. गजेेंद्र भानजी, उपाध्यक्षपदी चंदू पाटील, रविकांत पेरेकर, सरचिटणीस पदी सुनिल कोळी, उपचिटणीस पदी विजय वरळीकर, विजय आवसकर, खजिनदार पदी विश्वनाथ कोळी तर सल्लागार पदी ज्येष्ठ नेते दामोदर तांडेल आणि रामभाऊ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
कोळी महासंघ मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन कोळी समाजाला महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे पण नवनियुक्त अध्यक्ष नामदेव भगत यांनी बोलून दाखविला. तर नवी मुंबईतील कोळी समाजाच्या उन्नतीसाठी आपण विशेषत्वाने प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही उपाध्यक्ष चंदू पाटील यांनी दिली.
सदर बैठकीस कोळी महासंघाच्या 18 पॉलिट ब्युरोपैकी 12 पॉलिट ब्युरो पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक द्वारकानाथ भोईर, पंकज बना, उल्हास वटकर, सुरेखा तावडे, आदिंचा समावेश होता.
दरम्यान, कोळी महासंघाच्या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी कोळी समाजावर होणारे अन्याय आणि सरकारकडून होणारी डोळेझाक यासाठी कोळी महासंघाच्या माध्यमातून आगामी कालावधीत लढा उभारणार असल्याचे सांगितले.
मासेमारीचा व्यवसाय करणार्या कोळी समाजाच्या समस्या सोडविताना त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांनी पकडलेल्या माशांना जवळच मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारकडून कोळी लोकांच्या निवासासाठी प्रयत्न करणे, मासेमारीवर अवलंबून असलेल्या अन्य व्यवसायाचे कोळी लोकांना प्रशिक्षण देणे, जेटीवर असलेल्या कोळी लोकांच्या साहित्याला सुरक्षा प्रदान करण्याला प्राधान्य देणे यासह अन्य विविध कामांना प्राधान्य देणार असल्याची माहिती नामदेव भगत यांनी नवी मुंबई लाईव्हशी बोलताना दिली.