8369924646 / 8082097775
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ येथील ब प्रभाग समिती कार्यालयात पाणीपुरवठा विभागात गेल्या दीड-दोन महिन्यापासून कनिष्ठ अभियंताच उपलब्ध नाही. पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता नसल्याने उपअभियंत्यांसह अन्य उर्वरित कर्मचार्यांवर कामाचा कमालीचा ताण पडला असून पाणीचोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
नेरूळ विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाअंर्तगत बेलापुर किल्ले गावठाणापासून ते नेरूळ सेक्टर 2-4 पर्यतचा परिसर, नेरूळ फेज1,2,3 या परिसराचा समावेश होत आहे. विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंते नसतानाही कामामध्ये कोठेही समन्वय पहावयास मिळत नाही. त्यातच या कार्यक्षेत्रात असलेल्या गावठाण परिसरात पाणीचोरीचेही प्रमाण वाढीस लागले आहे. गावठाणातील इमारतींसह त्या परिसराती वाणिज्यिक वापरासाठीही पाणीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात सारसोळे गावामधील पालिका शाळेजवळ असलेल्या सर्व्हिस सेंटरच्या कामाकरिता सर्रासपणे पाणीचोरी केली जात आहे. येथील पाणीपुरवठा खंडीत केल्यावर सर्व्हिस सेंटरवाले अवघ्या तासाभरात पुन्हा पाणीचोरीच्या कामाला सुरूवात करत असल्याची माहिती पालिका कर्मचार्यांनी दिली.
गावठाण परिसरातील इमारतींमध्ये एक-दोन नाही तर चार ते पाच अनधिकृत नळजोडण्या पहावयास मिळत असून कारवाई केल्यावर अवघ्या तासाभरातच पाणीचोरी करणारे नळजोडण्या जोडून घेत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांनी सांगितले. कनिष्ठ अभियंत्यांच्या दोन जागा रिक्त असल्याने उपअभियंता व अन्य कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला असून याबाबत प्रशासनाच्या व नगरसेवकांच्या कानावर प्रकार घालूनही कोणी लक्ष देत नसल्याची नाराजी पाणीपुरवठा कर्मचार्यांनी दिली. अनधिकृत नळजोडण्या करणार्यांना नगरसेवक तसेच अन्य राजकीय घटकांचा एकगठ्ठा मतांसाठी पाठिंबा असल्याने अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याच्या कारवाईत अडथळे येतात अथवा कारवाई केल्यावर हेच राजकीय घटक प्लंबर आणून तोडलेल्या नळजोडण्या पुन्हा जोडत असल्याची माहिती संबंधित कर्मचार्यांनी दिली.