स्वयंम न्यज ब्युरो :8369924646 / 8082097775
नवी मुंबई : महाराष्ट्रातील प्रगत म्हणविणार्या तसेच सातत्याने केंद्र व राज्य सरकार दरबारी पारितोषिके मिळविणार्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा कारभार कंत्राटी कामगारांच्या बाबतीत आजही दिव्याखाली अंधार या स्वरूपाचाच आहे. गणेशोत्सव आता अवघ्या आठवड्यावर आला असतानाही मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचा जुन व जुलै महिन्याचा पगार झालेला नाही. विशेष म्हणजे मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचा गेल्या काही वर्षापासून सातत्याने पगाराबाबत साडे साती सुरू असतानाही नगरसेवक व पालिका प्रशासन ठेकेदाराचीच पाठराखण करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मूषक नियत्रंण विभागात जवळपास 50च्या आसपास कंत्राटी कामगार काम करत असून दिवसा व रात्री अशा दोन सत्रांमध्ये मूषक नियत्रंक कामगार काम करतात. या कामगारांना मूषक पकडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदाराकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही. साधे मूषक मारण्याचे औषध टाकण्यासाठी तसेच मेलेले उंदिर पकडण्यासाठी ग्लोव्हजही पालिका प्रशासनाकडून अथवा ठेकेदाराकडून उपलब्ध करून दिले जात नाही. उंदिर पकडण्यासाठी काठी आणि उंदिर शोधण्यासाठी विजेरीही (टॉर्च) कामगार स्वत:च्या खिशातून आणत असतात.
इतर विभागातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर कामगार संघटना संघर्ष करत असताना मूषक नियत्रंण विभागातील कामगारांच्या विलंब वेतनाबाबत कोणतीही कामगार संघटना फारसा संघर्ष करताना पहावयास मिळत नाही. पालिकेतील नगरसेवकांनादेखील मूषक नियत्रंण कामगारांची वेतनाबाबतची ससेहोलपट माहिती असतानाही स्थायी समितीमध्ये अथवा महासभेमध्येही या कामगारांच्या वेतन विलंबाबाबत आवाज उठविला जात नाही मूषक नियत्रंण विभागाचे कामगार हे नवी मुंबईत तसेच मुंबईतील गोवंडी-मानखुर्द भागात भाड्याच्या घरामध्ये राहत असून घरभाडे व संसार त्यांना तुटपुंज्या पगारात चालवावा लागत आहे. पगार थकल्याने घरभाडे भरण्यासाठी तसेच संसार चालविण्यासाठी त्यांना दर महिन्याला कोणाकडे तरी हात पसरावे लागत असल्याची माहिती कामगारांची दिली. ठेकेदाराकडून दोन ते तीन महिन्याचे वेतन थकीत असतानाही पालिका प्रशासन व नगरसेवक ठेकेदाराला जाब विचारण्याऐवजी त्याचीच पाठराखण करत असल्याचा संताप मूषक नियत्रंण कामगारांकडून व्यक्त केला जात आहे.