* बिमा कॉम्प्लेक्सचा दोन दशकांचा बाप्पा
* समाजप्रबोधनाचा वसा घेतलेला विघ्नहर्ता पुरस्काराने सन्मानित
पनवेल : बाबुराव खेडेकर
कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाने दोन दशके म्हणजेच २० वर्षे पूर्ण केली आहेत. या वाटचालीत अनेक लहान मोठ्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या या मंडळाला गेल्या वर्षीचा विघ्नहर्ता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेल्या मंडळाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या कांही दिवस आधी विघ्नहर्ता पुरस्कार देण्यात येतो. २०१६ चा हा मानाचा पुरस्कार कळंबोली मधील भाजप नेते रामदास शेवाळे यांच्या बिमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाला मिळाला आहे. नवीमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल,उपमहापौर चारुशीला घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दिनांक १६ ऑगस्ट) पिल्लेज कॉलेजमध्ये समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला.समाज प्रबोधनाचा वारसा कायम राखणार अशी प्रतिक्रिया रामदास शेवाळे यांनी यानिमित्ताने दिली आहे.
गणेशोत्सवात पोलिसांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. त्यांच्या घरच्या गणपतीपेक्षा सार्वजनिक गणपतींनी त्यांच्याही मनात घर केलेले असते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पोलिसांना मदत करीत असतात. अशा गणेशोत्सव मंडळांचा यथोचित सन्मान गेली अनेक वर्षे नवीमुंबई पोलीस आयुक्तालय करीत असते. त्यामुळेच अत्यंत मानाचा हा विघ्नहर्ता पुरस्कार कोणत्या मंडळाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महासभेमुळे पुरस्कार वितरण सोहळा फडके नाट्यगृहाऐवजी पिल्लेज कॉलेजमध्ये घेण्यात आला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बिमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाला मिळाले यावेळी प्रदान करण्यात आले.
समाज प्रबोधन करणारे विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेले देखावे ,एकावेळी ३०० भक्त उभे राहून देखावा पाहू शकतील इतकी क्षमता आणि शिस्तबद्ध पद्धतीने हाताळली जाणारी रांग हि वैशिष्ठे बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आहेत. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेतली जात असल्यामुळेच दिवसाला ३००० गणेशभक्त बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला भेट देत असतात. विविध शिबिरे आणि विध्यार्थी गुणगौरव यावेळी केला जातो. या परंपरेत खंड पडू न देता मंडळाने अविरत वाटचाल केली आहे. त्यामुळेच विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार देऊन नवीमुंबई पोलीस आयुक्तांनी मंडळाचा सन्मान केला आहे. याहीवर्षी मंडळाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून देशभक्ती या थीमवर काम सुरु आहे. कळंबोली आणि पनवेल परिसरातील गणेशभक्त गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असून अनेक मंडळे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेली आहेत.
कोट
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायाची भूमिका समोर ठेवून लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू मनात ठेवून बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सातत्याने समाजप्रबोधनाचे काम करीत आहे. त्यातूनच स्त्रीभृण हत्या,मुलगी शिकवा,हुंडा बळी,इंटरनेटचा दुरुपयोग अशा विषयांवर आम्ही समाजप्रबोधन केले. गेल्यावर्षी लेक माझी लाडाची या थीमवर आम्ही काम केले त्याबद्धल हा सन्मान आम्हाला मिळाला आहे. यावर्षी मंडळाने देशभक्ती या थीमवर काम सुरु केले आहे.
— रामदास शेवाळे
अध्यक्ष
बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ