** कांतीलाल प्रतिष्ठानच्या शिरपेचात मानाचा तुरा, द्वितीय क्रमांक पटकावला
पनवेल : गणेशोत्सव काळात मुलींची छेडछाड होत असल्याने वयात आलेल्या मुली घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्या मनात भितीचे वातवरण निर्माण झालेले असते. ती भीती दूर करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेवून प्रत्येक तरूणीचा आत्मविश्वास वाढीस लागेल असे भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी झटावे, असे आवाहन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले.
नवी मुंबई परिमंडळ-2 अंतर्गत विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित पनवेलचा महागणपतीला सलग दुसर्यांदा द्वितीय क्रमांक मिळाला. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त प्रशांत बुरडे, विशेष शाखेचा पोलिस उपायुक्त बनसोडे,वाहतूक विभागाचे उपायुक्त नितीन पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड, राजकुमार चाफेकर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होत्या.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास सांगताना ब्रिटिशांनी केलेल्या एका घोडचुकीवर बोट ठेवून लोकमान्य टिळकांनी धर्मासाठी जनआंदोलन उभे केले. एकत्र येण्यास ब्रिटिश सरकारने बंदी कायदा आणला होता, परंतु, धर्म कार्यासाठी कायद्यात मुभा होती. ती चुक हेरून टिळकांनी गणेशोत्सव सुरू करून जनआंदोलन सुरू केले. आपणही समाज प्रबोधन करताना देशहित, सामाजिक हिताला प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
पोलिस कर्तव्य बजावत असतो. गणेशोत्सवाच्या वेळी कर्तव्य बजावणार्या पोलिसांना आपल्या घरातील बाप्पा वाटेल तेव्हाच उत्सवाचे मोल वाढेल, असा चिमटा आयुक्तांनी काढून तणाव वाटणार्या पोलिसांना घरचा आहेर दिला.
यावेळी अनेक पुरस्कारांचे वितरण आणि काही सामाजिक कार्यकर्ता तसेच उत्कृष्ट पोलिस कर्मचारी , अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण सूत्रसंचालन प्रकाश निलेवाड यांनी तर आभार राजकुमार चाफेकर यांनी मानले. कार्यक्रमाला गरीबांचा देव असलेले डॉ. गिरिश गुणे, रोटरीचे अध्यक्ष शिरीष वारंगे, डॉ. रमेश पटेल, डॉ. लोहारे, संघर्षच्या उपाध्यक्ष माधुरी गोसावी, यांच्यासह प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाली होते. नवीन पनवेल येथील पिल्ले कॉलेजचे वातानुकूलित सभागृह खचाखच भरले होते. सुनील बाजारे, मालोजी शिंदे, जयराज छापरिया, के. आर. पोपरे, दिलीप काळे, काकडे, राजेंद्र आव्हाड, अशोक नाईक आदी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच अधिकारी उपस्थित होते. पनवेल कर्मचारी वर्गाने उत्तम नियोजन आणि मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
चौकट
पारितोषिक समितीचा स्वतंत्र निर्णय
ज्यांना पारितोषिके मिळाली आहेत, त्यांचे अभिनंदन करताना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी परिक्षण कमिटीच्या निर्णयाशी पोलिसांचा काही एक संबंध नसल्याचे सांगत, तो कमिटीचा स्वतंत्र निर्णय असल्याचे सांगुन त्यांनीही कमिटीच्या सदस्यांचे कान टोचले.