स्वयंम न्युज ब्युरो : 8082097775 / 8369924646
नवी मुंबई : 21 व्या शतकातील सुनियोजित आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व नागरिकांच्या सुविधांविषयीच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नव्याने पदसंख्या व आकृतीबंध मंजूर करणे आवश्यक होते. आकृतीबंध मंजूर नसल्याने पदभरती करण्यात अनेक अडचणी येत होत्या व त्याचा थेट परिणाम नियमित कामकाजावर व कार्यक्षमतेवर दिसून येत होता.
नवी मुंबई : 21 व्या शतकातील सुनियोजित आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व नागरिकांच्या सुविधांविषयीच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नव्याने पदसंख्या व आकृतीबंध मंजूर करणे आवश्यक होते. आकृतीबंध मंजूर नसल्याने पदभरती करण्यात अनेक अडचणी येत होत्या व त्याचा थेट परिणाम नियमित कामकाजावर व कार्यक्षमतेवर दिसून येत होता.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे नवीन 656 पदे मंजूर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याविषयी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेमार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (नवि-2) श्रीम. मनिषा म्हैसकर यांनी या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत अनेक बैठका घेतल्या. त्यास अनुसरून आज दि. 21 ऑगस्ट 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्र. 1215/394/प्र.क्र.16/15/नवि-28 अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेत विविध संवर्गातील नवीन 656 पदे मंजूर करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात सुनियोजितता व गतिमानता येण्यात लक्षणीय भर पडणार आहे.
यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 3279 पदांना शासन मंजूरी लाभलेली होती. आता या शासन निर्णायान्वये 656 नवीन पदांना मंजूरी प्राप्त झालेली असून एकूण 3935 पदांचा महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. या मंजूरीत प्रशासन, अभियांत्रिकी, आरोग्य, सचिव अशा सर्वच विभागांच्या विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. यामध्ये विशेषत्वाने नागरिकांचा विविध कामांसाठी संपर्क येतो अशा विभाग कार्यालयांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य व अग्निशमन विभाग बळकट करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षा, परवाना, पर्यावरण, विधी, आपत्ती व्यवस्थापन अशा महत्वाच्या विभागांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे.
सन 2008 पासून तत्कालीन आयुक्तांमार्फत महानगरपालिकेची गरज लक्षात घेऊन विभागनिहाय आवश्यक पदांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव शासन मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात त्यामधील विशेषत्वाने आरोग्य व अग्निशमन विभागातील विविध संवर्गातील पदनिर्मितीस शासन मंजूरीही प्राप्त झाली होती, तथापि महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मान्यता लाभली नव्हती.
डॉ. रामास्वामी एन. यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ते विविध विभागांचा कार्य आढावा घेत असताना त्यांना महानगरपालिकेतील अपु-या कर्मचारीवृंदामुळे येणा-या अडचणी लक्षात येत होत्या. याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत होते. त्यामुळे शासन स्तरावर मंजूरी प्रक्रियेत असणा-या उर्वरित पदनिर्मितीच्या व आकृतीबंधाच्या मंजूरीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले व पाठपुरावा केला. याविषयी अनेक बैठका झाल्या. सविस्तर चर्चेअंती शासनाच्या नगरविकास विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेत विविध संवर्गातील नवीन 656 पदे मंजूर करण्यात आली असून महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा इतर महानगरपालिकांच्या तुलनेत सर्वात कमी 20.25 टक्के इतका मर्यादित असून या शासन निर्णयामुळे महापालिकेच्या कामकाजात अधिक सूसुत्रता येणार आहे.