नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंण कामगारांचे जुन व जुलै महिन्याचे वेतन अजून झालेले नाही. गणेशोत्सव आता अवघ्या दोन महिन्यावर आलेला आहे. या दोन दिवसाच्या आत मूषक नियत्रंक कामगारांना थकीत वेतन न मिळाल्यास रस्त्यावर उतरून भिक मागो आंदोलन करून त्यांच्या वेतनासाठी निधी गोळा करण्याचा इशारा इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात जवळपास 50च्या आसपास मूषक नियत्रंक विभागात कामगार काम करत आहेत. पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदारांकडून त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. सकाळ व रात्र अशा दोन सत्रांमध्ये हे कामगार काम करत आहेत. रात्रीच्या वेळी मृत उंदिर शोधण्यासाठी, पकडण्यासाठी, गोळ्या टाकण्यासाठी आवश्यक लागणारी काठी व विजेरी (टॉर्च) त्यांना आपल्याच खर्चाने आणावी लागत आहे. अवघ्या 10 ते 11 हजार तुटपुंज्या वेतनावर हे कामगार काम करत आहेत. आता ऑगस्ट महिना संपत आला असला तरी त्यांना जुन व जुलैचे वेतन अजून मिळालेले नाही. गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसावर आलेला आहे. महागाईच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे पाहता त्यांना जगणे अवघड होवून बसले आहे. त्यातच वेतन विलंबामुळे संबंधित कामगार कर्जबाजारी झाले असून व्याजाने पैसे उचलण्याची पाळी त्यांच्यावर महापालिका प्रशासनामुळे आलेली आहे.मूषक नियत्रंण कामगारांनी व त्यांच्या परिवाराने आत्महत्या करण्याची महापालिका प्रशासन वाट पाहत आहे काय? असा संतप्त सवाल रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनातून विचारला आहे.
येत्या दोन दिवसात महापालिका प्रशासनाकडून मूषक नियत्रंण कामगारांचे जुन व जुलै या दोन महिन्याचे थकीत वेतन तात्काळ न दिल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने नवी मुंबईत रस्त्यावर उतरून मूषक नियत्रंक कामगारांसाठी भीक मागो आंदोलन करून निधी उभा केला जाईल. या प्रकारातून राज्यात आपल्या महापालिका प्रशासनाची नाचक्की झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.