स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 9619197444
नवी मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर आलेला असतानाही नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांची दुर्रावस्था कायम आहे. मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी दोन दिवसात रस्त्यांची डागडूजी न झाल्यास रस्त्यांना पालिका अधिकारी व ठेकेदारांची नावे देण्याचा इशारा देताच महापालिका प्रशासनाला जाग आली आणि दोन ते तीन दिवसातच रस्त्यांची डागडूजी करण्याचे लेखी आश्वासन पालिकेच्या शहर अभियंत्यांनी मनसेला दिले आहे.
22 ऑगस्ट रोजी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा शहर अभियंता मोहन डगावकर यांना निवेदनाद्वारे गणेशोत्सवापूर्वी नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास मनपा अभियंते व कंत्राटदारांची नावे खड्ड्यांना देण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर तात्काळ 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबई मनपा शहर अभियंता मोहन डगावकर यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी पूर्ण करण्यात येईल व गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत आणण्यात येतील असे लेखी पत्र मनसेला दिले. संततधार पावसामुळे रस्ते डागडूजीस विलंब झाला असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी महापालिका प्रशासनाची ही लंगडी सबब व वेळकाढूपणाचे समर्थन करण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासन झोपा काढत होते काय आणि पावसात रस्ते खराब झाले तरी पाऊसाचे विश्रांती घेताच तात्काळ युध्दपातळीवर महापालिका प्रशासनाने रस्त्यांची डागडूजी करणे आवश्यक आहे. खराब रस्ते कायम ठेवून महापालिका प्रशासन नवी मुंबईकरांना पाठदुखी व इतर आजारांची भेट देत असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.