नवी मुंबई : महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांना दिव्यांग कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथील विशेष समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय व पर्यावरण मंत्री थावर चंद गहलोत यांच्या हस्ते “दिव्यांग कल्याण कार्यातील प्रथम आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2017 (1st International Excellence Award 2017)” प्रदान करण्यात आला.
अमेरिका, इंग्लंड, दुबई, फ्रांन्स, इराण, नेपाळ, झिंबावे अशा विविध 12 देशांमधून दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा-या संस्थांना तसेच व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये भारत देशातील 8 ते 10 संस्थांना आणि 3 व्यक्तींना या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्यात आला नव्हता तर या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींमार्फत भारतातील 3 पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये डॉ. वर्षा भगत यांनी दिव्यांगांसाठी सेवाभावी वृत्तीने केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाची निवड केली.
असोसिएशन फॉर डिसॅबल्ड पिपल, असोसिएशन ऑफ स्पेशल एज्युकेटर्स, अलाईड प्रोफेशनल्स आणि पाप्रा स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी देशपरदेशातून दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा-या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मंत्रीमहोदयांसमवेत डिसॅबिलिटी कमिशनर डॉ. कमलेशकुमार पांडे, माजी सामाजिक न्याय सचिव लव शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांना यापुर्वीही अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून केंद्र सरकारच्या वतीने सन 2009- 2010 मध्ये नागरी प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा पुरविणारे देशातील एकमेव केंद्र म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या संचालक म्हणून डॉ. वर्षा भगत यांनी केलेले दिव्यांग कल्याणकारी कार्य विविध स्तरांवर नावाजले जात आहे. त्यामध्ये या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची भर पडल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.