नवी मुंबई : सार्वजनिक व घरगुती स्वरूपात 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017 या कालावधीत अत्यंत उत्साहाने साजरा होणारा विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज असून संबंधित विभाग कार्यालयांत एक खिडकी योजनेव्दारे श्रीगणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना महानगरपालिका, पोलीस, वाहतुक पोलीस,अग्निशमन, विद्युत अशा सर्व विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याव्दारे महापालिका क्षेत्रातील 336 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ब-याच गणेशोत्सव मंडळांनी आपल्या परवानग्या प्राप्त करून घेतल्या आहेत व इतर मंडळांच्या कागदपत्र पूर्ततेनंतर त्यांना लगेच परवानगी देण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, शहर अभियंता, परिमंडळ १ व २ चे उपआयुक्त तसेच संबंधित विभागाचे सहा.आयुक्त – विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत महापालिका क्षेत्रातील सर्व 23 विसर्जनस्थळांवर विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आज महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह विसर्जन स्थळांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच आवश्यक त्या ठिकाणी मौलिक सूचना केल्या.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून यावर्षी पर्यावरणपूरक (Eco-Friendly) गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले असून तशा प्रकारचे आवाहन यापूर्वीच मंडळांना करण्यात आलेले आहे. यावर्षीच्या महानगरपालिका आयोजित नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धेतही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची साफसफाई व त्या परिसरात आवश्यक दुरूस्ती करण्यात आलेली आहे. ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत महानगरपालिकेमर्फत मुख्य १४ तलावांमध्ये करण्यात आलेल्या इटालियन गॅबियन वॉलच्या विशिष्ट रचनेव्दारे श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशिष्ट जागा निर्माण करण्यात आलेली आहे. भाविकांनी व श्रीगणेशोत्सव मंडळांनी याच ठिकाणी श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या याही वर्षी करण्यात येत आहे.
विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात 5, नेरूळ विभागात 2, वाशी विभागात 3, तुर्भे विभागात 2, कोपरखैरणे विभागात 3, घणसोली विभागात 4, ऐरोली विभागात 3, दिघा विभागात 1 अशा एकूण २३ विसर्जनस्थळांवर श्रीमुर्तींच्या विसर्जनकरीता तराफ्यांची व आकाराने मोठ्या मुर्ती विसर्जित होणा-या तलावांठिकाणी क्रेन / ट्रॉलीची सुविधा करण्यात आली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले आहे. यावर्षीच्या विसर्जन सोहळयातील नाविन्य म्हणजे काही विसर्जनस्थळांवर सेतू ॲडव्हर्टाझिंग यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील विसर्जन किऑक्स उभारण्यात येत आहेत.
प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेश्या विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था तसेच प्रथमोपचार कक्ष असणार आहे.त्याचप्रमाणे विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून सुविधा मंच उभारण्यात येत आहेत. त्याठिकाणी श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याकरीता करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे. श्रीमूर्ती विसर्जनासाठी 23 विसर्जनस्थळांवर 724 स्वयंसेवक नेमण्यात आले असून याशिवाय तेथे अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् तैनात असणार आहेत.
सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात येत असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रसाद साहित्य व फळे गरजू नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे. स्वतंत्र वाहनाव्दारे दररोज निर्माल्याची वाहतुक करण्यात येणार असून निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेप्रमाणेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्षतेने कार्यरत असणार आहे. ध्वनी प्रदूषण विषयक विहित मर्यादा पातळीची मर्यादा सांभाळायची असून नागरिकांनी इतरांना त्रास होणार नाही इतकीच विहित मर्यादेत ध्वनीपातळी ठेवायची आहे. भाविक भक्तजनांनी श्रीगणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी आपल्याकडील मौल्यवान वस्तू व लहान मुले यांची काळजी घ्यावी तसेच वैयक्तिक व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहावे आणि कोठेही बेवारस वस्तू आढळल्यास त्यास हात न लावता त्याठिकाणी कार्यरत पोलीस यंत्रणेशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय संयुक्तपणे गणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी दक्ष असून भाविक भक्तजनांनीही याकामी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.