पनवेलचा महागणपती मातृशक्तीपीठात विराजमान
पनवेल: वर्पषभर पनवेलकरांना उत्स्तुकता लागून राहिलेल्या पनवेलचा महागणपतीची स्थापना काल सकाळी मंत्रोच्चारांच्या जयघोषात करण्यात आली. साडेतीन शक्तीपीठांच्या मातृपीठात महाराष्ट्राची कुळस्वामीनी तुळजाभवानी, कोल्हापूर निवासीनी महालक्ष्मी, माहूरची आद्यशक्ती रेणुकादेवी आणि वणीचे अर्धपीठ असलेली ममतास्वरूप सप्तशृंगी देवींची शास्त्रोक्तपद्धतीने वेदकुळाचाराने स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल आणि सौभाग्यवती रूपा कडू दांपत्याच्या शुभहस्ते पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे मातृशक्तीपीठाच्या स्थापनेला शंखनाद करत वरूणराजाने उपस्थिती दर्शवली. दिवसभर त्याने शक्तीपीठावर जलाभिषेक केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन हॉस्पिटलसमोरील नूतन गुजराथी शाळा मैदानावर कांतीलाल प्रतिष्ठानचा पनवेलचा महागणपती महोत्सव साजरा होत आहे. आकर्षक शामियाना, साडेतीन शक्तिपीठ, उत्कृष्ठ विद्युत रोषणाई, समाज प्रबोधनाचे संदेश देणारे फलक अशी रचना करण्यात आली आहे. स्व. बाळाराम कुंडाजी ठाकूर यांना समर्पित केलेल्या सभामंडपाचे प्रवेशद्वार नृरसिंह अवताराची आठवण करून देणारे आहे. प्रवेशद्वारापासून शक्तीपीठापर्यंत लाल, हिरवा गालिचा अंथरण्यात आलेला आहे. दुतर्फा विविध रंगांची, वेगवेगळ्या प्रकारची झाडांची रचना करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि पावसाची लढाई काल दिवसभर सुरू होती. तरी देखील महागणपतीच्या भक्तांनी धीटपणे घराबाहेर पडून दर्शन घेतले. महागणपतीच्या भक्तांमध्ये विविध जाती, पंथांच्या भक्तांचा समावेश काल बघायला मिळत होता. मातृशक्तीपीठ, राजन खातू यांच्या संकल्पपणेतून साकारलेली अष्टभुजा नारायणी स्वरूप महागणपतीची बोलकी मूर्ती, मंत्रोच्चाराने वाढलेले तेज, ओजस्वी मूर्ती निरखून भक्त तृप्तीचे ढेकर देत समाधानाने बाप्पाचा निरोप घेत होते. सगळीकडे गोडधोड खाऊन कंटाळलेले भक्त इथे मात्र महागणपतीच्या जन्मोत्सवाचा सुंठवड्याचा प्रसाद घेत होते. मातृशक्तीपीठाची स्थापना वाराणसी क्षेत्राहून आलेले पंडित प्रदीप अग्नीहोत्री यांनी तर महागणपतीची पूजा अतुल मनोहर यांनी बांधली.