पनवेल: सरीवर सरी कोसळत होत्या…. आसमंत गारव्याने व्यापला होता…. शांतरस वाहत होता….. भरपावसात श्री भक्तांची दर्शनाची ओढ बाप्पाला अधिक खुळवत होती, त्याच दरम्यान पनवेलच्या मातृशक्ती पीठात भक्तीसुरांची लयलूट सुरू होती. कबीरपंथाला आळवत किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक अरुणबुवा कारेकर यांनी कबिरांच्या रचनांतून “मत कर मोह तू, हरी भजन को मान ले…. अशी सुरावटीतून नम्रपणे विनवणी केली.
सद्यःस्थितीवर भाष्य करणारी कबिरांची बोलीभाषा ऐकत आभाळही भरून आले होते.
कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने पनवेलचा महागणपतीसह साडेतीन शक्तीपीठांच्या मातृपीठाची स्थापना नूतन गुजराथी शाळा मैदानावर केली आहे. मातृपीठाला “अवघाची संसार सुखाचा करेन, हा भक्तीरस निर्माण केला आहे. त्या अंतर्गत आज अरुणबुवा कारेकर, दत्तारामबुवा पाटील (विंधणे) आदिंनी सेवा अदा केली. आकाश आणि वैभव पाटील यांनी त्या॑ना साथ केली.
तबला, पखवाजवर प्रत्येक थापेला सूर उमटत होते. अरुणबुवा आणि दत्ताराम बुवांनी आपल्या स्पष्ट स्वरांतून कानसेनांना तृप्त केले. जय जय राम कृष्ण हरीचा सूर टिपेला पोहचला तसे वरूणराजाने तांडव करत टाळ, चिपळ्या वाजवून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
संत तुकोबांच्या, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि, शशिकला लोपलीया…. भगवंताचे वर्णन करताना तुकोबांच्या वाणीला जे तेज चढले होते, त्या नवरसांची उधळण करत कारेकर बुवांनी सप्तऋषी, संत आणि साक्षात चिरंजीवी असलेल्या हनुमंतला आळवले होते.
देव राज आले, मंचकी बैसले या रचनेतून पनवेलचा महागणपतीचे अवीट वर्णन
केले. कारेकर बुवा यांनी खास स्वरचित, गौरी नंदन गजानन हा अभंग सादर केला. आधी मन घेई धाव …अशा एकापेक्षा एक रचनांची सेवा करून मातृशक्तीपीठाला स्वरांचा साज चढविला.
प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मंगल भारवड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.