स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : काँग्रेस पक्षाचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताचा पालिका प्रशासनाला जाग आली आणि नेरूळ येथील राजीव गांधी उड्डानपुलाखालील तसेच सभोवतालच्या परिसरात पालिका प्रशासनाकडून मुबलक प्रमाणात वीज पुरवठा उपलब्ध करून देताना सर्वत्र एलईडी लाईटही तात्काळ बसविल्या आहेत.
गणेशोत्सव अवघ्या चार ते पाच दिवसावर आलेला असतानाही त्या ठिकाणी असलेला अंधार व अपुर्या उजेडाची समस्या लक्षात घेता त्याअगोदर नेरूळ सेक्टर आठ व दोनमधील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील व लगतचा परिसर, सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व 25 परिसरातील हायमस्ट, पथदिव्यांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनातून काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना दिला होता.
नेरूळ पश्चिमेला सेक्टर 2 आणि 8 परिसरात राजीव गांधी उड्डाणपुल आहे. गेल्या काही महिन्यापासून या उड्डाणपुलाखालील परिसरात तसेच लगतच्या परिसरात सांयकाळनंतर अंधुक प्रकाशामुळे स्थानिक रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून हायमस्ट व अन्य पथदिवे उपलब्ध केले असले तरी त्यातून पुरेसा प्रकाश येत नसल्याने तात्काळ हायमस्टमधील व पथदिव्यामधील बल्ब बदली करण्यात यावेत. आता अवघ्या 4 ते 5 दिवसावर गणेशोत्सव आलेला असल्याचे सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताना पुलाखालील भागात गेल्या अनेक वर्षापासून सेक्टर 2-8-10चा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असल्याचे सांगितले. नेरूळ पश्चिमेकडील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती याच भागातून चिंचोलीच्या जुईनगर तलावात विसर्जनासाठी जात असतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता युध्दपातळीवर या समस्येचे निवारण झालेच पाहिजे याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली होती.
नेरूळ सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व परिसरातही पथदिव्याच्या अंधुक उजेडाबाबत स्थानिक रहीवाशांकडून याच स्वरूपातील तक्रारी सावंत यांच्याकडे येत होत्या. पथदिव्यांचा पदपथावर उजेड पडत नाही तर रस्त्यावर काय उजेड पडणार असा प्रश्न उपस्थित करून सावंत यांनी थेट पालिका आयुक्तांनाच या समस्येची पाहणी करण्यासाठी निमंत्रित केले होते. राजीव गांधी उड्डाणपुलाखालील परिसर, नेरूळ सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व 25 परिसरातील हायमस्ट, पधदिव्यातून येणार्या अंधुक प्रकाशामुळे स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या समस्येचे निवारण न झाल्यास स्थानिक रहीवाशांसमवेत काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर तसेच नेरूळ विभाग कार्यालयासमोर आंदोलन व निदर्शने केली जातील तसेच अंधुक प्रकाशामुळे संतप्त रहीवाशांचा उद्रेक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील; असा इशारा यावेळी रवींद्र सावंत यांनी दिला होता.
रवींद्र सावंत यांनी दिलेल्या इशार्यानंतर पालिका प्रशासनाने परिसरात तात्काळ कार्यवाही सुरूवात केली. पालिका प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल रवींद्र सावंत यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.