स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
ठाणे ़: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपच्या उमेदवार डिंपल मेहता या महापौर म्हणून निवडून आल्या असून त्यांनी शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सेनेच्या अनिता पाटील यांना मतदान केल्याने सेना- कॉंग्रेसची छुपी आघाडी दिसून आली. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेस बरोबर मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीत युती केली नव्हती हे ते छातीठोकपणे सांगत होते, ते महापौर निवडणुकीत सिद्ध होऊन सेनेचा आणि कॉंग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे.
महापौर निवडणुकीत डिंपल मेहता यांना ६१ नगरसेवकांची मते मिळाली तर सेनेच्या उमेदवार अनिता पाटील यांना ३४ मते मिळाली. अनिता पाटील यांना कॉंग्रेसच्या १० आणि कॉंग्रेस पुरस्कृत २ अपक्ष नगरसेवकांची मते मिळाली आहेत.
महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी भाजपाचे ६१ नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात उपस्थित झाले होते. तर शिवसेना व कॉंग्रेसचे नगरसेवक एकत्र सभागृहात दाखल झाले. भाजपाकडून डिंपल मेहता या महापौरपदासाठीच्या उमेदवार होत्या तर शिवसेनेकडून अनिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत महापौरपदासाठी भाजपा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत बघायला मिळली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी भाजपाकडून वंदना भावसार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तर मीरा भाईंदर महापालिका उपमहापौर पदी अपेक्षे प्रमाणे भाजपचे चंद्रकांत वैती विजयी झाले. कॉंग्रेसच्या अनिल सावंत यांचा त्यांनी पराभव केला. चंद्रकांत वैती यांना ६१ मते मिळाली तर सावंत यांना ३४ मते मिळाली. सावंत यांना शिवसेनेच्या २२ नगरसेवकांनीसुद्धा मतदान केले. कॉंग्रेस पुरस्कृत २ अपक्ष नगरसेवकांनीही सावंत यांना मतदान केले. वैती हे माजी उपमहापौर तसेच माजी विरोधी पक्षनेते होते.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता राखली. बहुमताचा आकडा पार करत भाजपने ६१ जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे. भाजपाच्या लाटेने इतर पक्षांचा सुपडा साफ केला शिवसेना २२, कॉंग्रेस १० आणि इतरांना २ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर शिवसेनेला दुसर्या स्थानावर समाधान मानावं लागलं. कॉंग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसर्या स्थानावर फेकली गेली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.